सन्मानाने अध्यक्ष व निवडणुकीने सहअध्यक्ष निवडा
By Admin | Updated: July 30, 2014 01:18 IST2014-07-30T01:14:15+5:302014-07-30T01:18:28+5:30
औरंगाबाद : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारे वाद टाळण्यासाठी साहित्य महामंडळाने एका ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने नियुक्ती करावी

सन्मानाने अध्यक्ष व निवडणुकीने सहअध्यक्ष निवडा
औरंगाबाद : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारे वाद टाळण्यासाठी साहित्य महामंडळाने एका ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने नियुक्ती करावी व निवडणुकीने सहअध्यक्षांची निवड करावी, असा फार्म्युला पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या नियोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार भारत सासणे यांनी सुचविला आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड सन्मानाने व्हावी, असे आपले मत असल्याचे सांगून भारत सासणे म्हणाले, जोपर्यंत सन्माननीय तोडगा निघत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया अपरिहार्य आहे; परंतु यावर एक उपाय मी महामंडळास सुचविला आहे. महामंडळाने एका सन्माननीय साहित्यिकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी व निवडणुकीच्या मार्गाने सहअध्यक्ष निवडावा. एका मंचावर दोन अध्यक्ष असल्याने काहीही फरक पडणार नाही. उलट साहित्यप्रेमींचा फायदाच होईल व साहित्यिकांतील हेवेदावे, वाद संपुष्टात येतील. महामंडळाने मी सुचविलेल्या सूचनेवर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्यातील एक अग्रगण्य लेखक, ज्यांच्या साहित्याला बहुसंख्य संस्था, महाराष्ट्र फाउंडेशन, लाभशेटवार आणि महाराष्ट्र शासनाचे तब्बल ७ पुरस्कार मिळालेले आहेत व ज्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत, असे वाचकप्रिय लेखक भारत सासणे मंगळवारी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने औरंगाबादेत आले होते. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे वसमत येथे गेल्या वर्षी आयोजित ३५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. यावेळी ते लोकमतशी बोलत होते.
सासणे म्हणाले, महाराष्ट्रातून नामदेव पंजाबातील घुमानला गेले. आता ७०० वर्षांनंतर महाराष्ट्रातील १० हजारांहून अधिक साहित्यिक व साहित्यप्रेमी घुमानला जाणार आहेत. या क्षणाचा साक्षीदार होतानाच आपल्या जाणिवा व साहित्यविषयक विधायक भूमिका मांडण्याची संधी घेण्यासाठीच मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो आहे. या पदासाठी मी पात्र असून मराठवाड्यातील साहित्यप्रेमींनी मला ही संधी मिळवून द्यावी, असे आवाहन यानिमित्ताने मी करतो आहे. महामंडळाकडून मतदार याद्या प्रसिद्ध होताच आपण सर्वांशी संपर्क साधून विजयी करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मंच
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मंच असून त्याला मोठा आदरही आहे. या मंचावरून उत्तुंग, महनीय व्यक्तींनी आपले विचार, भूमिका मांडली आहे. त्यावर चर्चा आणि विचारमंथनही झाले आहे. या मंचावरून विचार मांडण्याची संधी ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने मिळते. त्यामुळेच या निवडणुकीत मी उडी घेतली आहे, असे मत सासणे यांनी व्यक्त केले.
४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध
४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध असलेले भारत सासणे यांची आगामी काही दिवसांत मौज प्रकाशनतर्फे दीर्घ कथासंग्रह, मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे वैचारिक लेखसंग्रह, बालसाहित्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
मूळ जालना येथील रहिवासी असलेले भारत सासणे प्रशासकीय सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, पुण्यात स्थायिक झाले आहेत.