अयोध्यानगरच्या समस्या मनपा सोडवेना
By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:23:07+5:302014-08-31T00:43:03+5:30
औरंगाबाद : संजयनगर, स्मशान मारुती मंदिर, गल्ली नं. ४ व इतर अंतर्गत गल्ल्यांत अस्वच्छतेचा कळस झाला असून, मनपाचे औषध फवारणी पथक रस्त्यावर कधी तरी येऊन जाते.

अयोध्यानगरच्या समस्या मनपा सोडवेना
औरंगाबाद : संजयनगर, स्मशान मारुती मंदिर, गल्ली नं. ४ व इतर अंतर्गत गल्ल्यांत अस्वच्छतेचा कळस झाला असून, मनपाचे औषध फवारणी पथक रस्त्यावर कधी तरी येऊन जाते. मात्र, डासांच्या प्रादुर्भावाने डेंग्यूची भीती वाढली आहे. सिडकोने मनपाच्या स्वाधीन केलेल्या वसाहतींमधील किरकोळ प्रश्न सोडविण्यासाठीही अनेकदा अडवणूक होते. अयोध्यानगराचाही तोच प्रश्न प्रलंबित आहे.
या भागात शासकीय व अशासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच कामगार वसाहत आहे. सध्या शहरात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढले असल्याने नागरिक दक्षता बाळगत आहेत. मनपाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे समजते. गल्लीत असलेल्या खांबावर विजेच्या जोडणीचे जाळे विणल्याने अपघाताची भीती सतत भेडसावते. जलवाहिनीला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने कावीळ, गॅस्ट्रोसदृश आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विकास निधीतून येथील रस्त्याचा व अनेक गल्ल्यांत ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागला; परंतु पाणी, पथदिवे, औषध फवारणी, सफाईच्या प्रश्नांचे मनपा निराकरण का करीत नाही, असा सवाल सावित्री मंडल, विलास काथार, जितेंद्र भारती, लता होणराव, रुख्मण कोल्हारे, हिरालाल खत्री, तसेच अयोध्यानगरातील नीलेश जुंबडे, किरण जाधव, अजय खंडारे, सुधीर मोकळे, योगेश भाकरे, मंगेश पैठणे, विपुल कुलकर्णी, धनेश तंटक, सुदर्शन पठाडे आदींनी उपस्थित केला.