विद्यापीठ गीत विस्तारासाठी अधिसभेत ठराव; गीतात बाबासाहेब आंबेडकर, नामांतर चळवळीच्या उल्लेखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:41 IST2025-09-23T19:41:25+5:302025-09-23T19:41:38+5:30
विद्यापीठाच्या गीतामध्ये डॉ. आंबेडकरांचे नावच नाही; गीतामध्ये बदलाची मागणी करणारा ठराव मांडला

विद्यापीठ गीत विस्तारासाठी अधिसभेत ठराव; गीतात बाबासाहेब आंबेडकर, नामांतर चळवळीच्या उल्लेखाची मागणी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गीतामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नामांतर चळवळ, नागसेनवनातील शिक्षणाचा, परंपरेचा कोणताही उल्लेख आलेला नाही. त्यामुळे गीतामध्ये बदल करीत या सर्वांच्या उल्लेखाने विस्तार करावा, अशी मागणी करणारा ठराव येत्या ३० सप्टेंबर रोजी बोलाविलेल्या बैठकीत एका अधिसभा सदस्याने मांडला आहे. या ठरावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठाच्या गीताची रचना कवी फ. मुं. शिंदे यांनी केलेली असून, प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायन केलेले आहे. या गीतामध्ये विद्यापीठाचा गौरव, अभिमान, इतिहास, परंपरा असल्या पाहिजेत, अशी चर्चा प्राध्यापकांच्या बामुक्टो संघटनेतर्फे करण्यात आली होती. तेव्हा विद्यापीठाच्या गीतामध्ये कालसुसंगत बदल करण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार बामुक्टो संघटनेचे पदाधिकारी तथा अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांनी याविषयीचा ठराव येत्या ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत मांडला आहे. हा ठराव चर्चेला आल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात येते की विरोध करण्यात येतो, याकडे उच्चशिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठाचा बोध व्हावा
सध्या अस्तित्वात असलेले गीत अतिशय उत्तम आहे. मात्र, ऐकल्यानंतर ते विद्यापीठाचेच गीत आहे का, अशी शंका सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण होते. विद्यापीठाचा त्या गीतातून बोध होत नाही. त्यामुळे गीत बदलण्यापेक्षा त्यातच विद्यापीठाच्या परंपरा, नामांतर चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नागसेनवनाचा उल्लेख गीतामध्ये असावा, अशी अपेक्षा आहे. त्यास अधिसभेत सर्वच सदस्य पाठिंबा देऊन बहुमताने ठराव मंजूर होईल.
-डॉ. उमाकांत राठोड, अधिसभा सदस्य, विद्यापीठ.