एसटीतील आरक्षण गायब; अंध अपंगांची गैरसोय
By Admin | Updated: June 11, 2014 00:27 IST2014-06-10T23:51:42+5:302014-06-11T00:27:33+5:30
किनगाव : एस़टी़ महामंडळाच्या बसेसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ४० टक्के आसन हे अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्यसैनिकांसाठी आरक्षित असतानाही त्याचा फायदा प्रवाशांना मिळत नाही़.

एसटीतील आरक्षण गायब; अंध अपंगांची गैरसोय
किनगाव : बहुजन हिताय् बहुजन सुखाय या ब्रिद वाक्याने सेवा देणाऱ्या एस़टी़ महामंडळाच्या बसेसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ४० टक्के आसन हे अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्यसैनिकांसाठी आरक्षित असतानाही त्याचा फायदा प्रवाशांना मिळत नसल्याने एस़टी़तील आरक्षण गायब झाले की काय? असा प्रश्न प्रवासी नागरिकांतून केला जात आहे़
महाराष्ट्रात जनसामान्यांच्या हक्काचे प्रभावी प्रवासाचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते़ एसटी महामंडळाच्या वतीने गाव तिथे एसटी बस असा उपक्रम राबवून प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसचे जाळे राज्यभर विणले आहे़ या बसने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात़ त्यात अंध, अपंग, वृद्ध, स्वातंत्र्यसैनिक, विधानसभा, राज्यसभा सदस्यांना प्रवासात अडचण होऊ नये म्हणून महामंडळाच्या ४४ आसन क्षमता असलेल्या बसमध्ये १८ आसन हे आरक्षित म्हणून घोषित केले आहेत़ त्यामध्ये आसन क्रमांक १ व २ विधानसभा व राज्यसभा सदस्यांसाठी ३ व ४ अंध व अपंगांसाठी, ६ ते ७ स्वातंत्र्यसैनिकांसाठी व ११ ते १६ ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि २१ ते २६ महिलांसाठी असे एकूण १८ आसन आरक्षित करण्यात आले असून, तशी नोंद त्या-त्या आसनावर करण्यात आली आहे़ तरीही दुसरेच प्रवासी त्यावर बसलेले दिसतात़ (वार्ताहर)
महामंडळ सर्वतोपरी आरक्षित जागेचा फायदा त्या-त्या प्रवाशांना मिळाला पाहिजे़ यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे़ परंतु, प्रवाशांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणार नाही़ तोपर्यंत आरक्षित जागेची परिस्थिती ‘जैसे थे’ राहील, असे अहमदपूरचे आगारप्रमुख एम़पी़जाधव म्हणाले़