Remdesivir Shortage : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे दोन प्रयोगशाळा चालक अटकेत, ६ इंजेक्शन्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:44 IST2021-05-04T19:42:40+5:302021-05-04T19:44:51+5:30
Remdesivir Shortage: ८ हजारात खरेदी करुन ३५ हजारांना एक असे विकले इंजेक्शन

Remdesivir Shortage : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे दोन प्रयोगशाळा चालक अटकेत, ६ इंजेक्शन्स जप्त
औरंगाबाद : कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात सर्रास काळाबाजार सुरु आहे. ३५ हजार रुपयांना एक रेमडेसिविर विक्री करण्यासाठी आलेल्या खाजगी प्रयोगशाळा चालकासह दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ६ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. परभणी येथील एका औषधी एजन्सी चालकाकडून त्यांनी हे रेमडेसिविर आणल्याची कबुली दिली.
संदीप आप्पासाहेब चवळी(२१, रा. सातारा परिसर) आणि गोपाल हिरालाल गांगवे (१९, रा. सातारा परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संदीप हा सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ युनी पॅथॉलॉजी लॅब चालवितो, तर गोपाल पुंडलिकनगर येथील एका लॅबवर काम करतो. बाजारात रेमडेसिविर उपलब्ध नसल्याचे पाहून आरोपींनी गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना गाठून ३५ हजारांत एक रेमडेसिविर विक्री करण्यास सुरुवात केली. याविषयी सोमवारी गुन्हे शाखेला माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, भगवान शिलोटे, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ, राजकुमार सूर्यवंशी आणि शिनगारे यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत आरोपीशी संपर्क साधला.
तेव्हा त्याने प्रति इंजेक्शन ३५ हजार रुपये असा दर सांगितला. शिवाय तत्काळ आणि रोखीने पैसे द्यावे लागतील, अशी अट घातली. दोन इंजेक्शनचे पैसे जमा असल्याचे त्याला सांगितले. यानंतर सायंकाळी चवळी याने पोलिसांच्या खबऱ्याला पैसे घेऊन पुंडलिकनगर रोडवरील मिठाई दुकानाजवळ बोलावले. पोलिसांनी औषधी निरीक्षक जीवन जाधव यांच्यासह तेथे सापळा लावला होता. चवळी तेथे आला आणि त्याने दोन इंजेक्शन पोलिसांच्या खबऱ्याला दाखविले. तेव्हा आणखी दोन इंजेक्शन पाहिजे असल्याचे पोलिसांनी खबऱ्याला सांगायला लावले असता चवळीने त्याचा साथीदार गांगवे याला फोन करुन बोलावून घेतले. गांगवेने इंजेक्शन आणल्याचे दिसताच खबऱ्याने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी त्यांना तेथेच पकडले. यावेळी दोन्ही आरोपींजवळ सहा रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले. आरोपीना अटक करून त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.