औरंगाबाद : नाकाबंदीदरम्यान पोलिसांना हुल देऊन जाणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले तेव्हा त्याच्याजवळ १० रेमडेसिविर इंजेक्शन्स आढळून आली. औषधी निरीक्षकांना पाचारण करून केलेल्या चौकशीत ही इंजेक्शन्स जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मिनी घाटीकडून उसणवारीवर गजानन हॉस्पिटलला देण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
सूत्राने सांगितले की, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार विकास खटके सोमवारी सायंकाळी गजानन महाराज चौकात नाकाबंदी करीत होते. यावेळी पुंडलिकनगरकडून आलेला दुचाकीचालक पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही तो थांबला नाही. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि पुढे काही अंतरावर त्याला पकडले. त्याच्याजवळील बॅगची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात १० रेमडेसिविर इंजेक्शन्स आढळून आली. त्याने त्याचे नाव गजानन गाडेकर (२६, रा. आविष्कार कॉलनी ) असे सांगितले. तो गजानन हॉस्पिटलमध्ये शिपाई आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मिनी घाटीतून ही इंजेक्शन्स उसणवारीवर आणल्याचे त्याने सांगितले. गजानन हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे या विषयी खात्री करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दाखवले. या आदेशात त्यांच्या रुग्णालयाचे नाव होते. ही इंजेक्शन्स मिनी घाटीतून उसणवारीवर मिळाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी औषधी निरीक्षक राजगोपाल बजाज यांना पाचारण केले. त्यांनी केलेल्या पडताळणीत यावर शिक्कामोर्तब झाले. याबाबत नोंद करून रेमडेसिविर तातडीने डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आले.