मागणी होताच ४८ तासांत टँकर पोहोचवा
By Admin | Updated: July 1, 2014 01:07 IST2014-07-01T01:00:14+5:302014-07-01T01:07:10+5:30
औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे.

मागणी होताच ४८ तासांत टँकर पोहोचवा
औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणाहून मागणी आल्यावर तेथे ४८ तासांच्या आत प्रशासनाने टँकर पोहोचवावा. टँकरच्या पुरेशा खेपा होतील याची काळजी घ्यावी, तसेच टँकर भरण्यासाठी लोडशेडिंगमुळे अडचण येत असेल तेथे जनरेटरची व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीला पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा शारदा जारवाल, महापौर कला ओझा, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय वाघचौरे, आ. सुभाष झांबड, तसेच विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासह समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली.
अब्दुल सत्तार यांनी लावली दोन वर्षांनंतर हजेरी
पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दोन वर्षांच्या खंडानंतर डीपीडीसीच्या बैठकीला हजेरी लावली. मे २०१२ मध्ये खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि आ. अब्दुल सत्तार यांच्यात शाद्बिक खडाजंगी झाली होती. या खडाजंगीनंतर अब्दुल सत्तार मध्येच बैठक सोडून निघून गेले होते.
तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पालकमंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या डीपीडीसीच्या बैठकीलाही हजेरी लावली नव्हती. कॅबिनेटमंत्री झाल्यानंतर आज पुन्हा एकदा ते डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित राहिले.
घाटी रुग्णालयाबाबत मंत्रालयात बैठक
घाटी रुग्णालयासाठी राज्य सरकारने १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून लवकरात लवकर कामे करण्यासाठी लवकरच मंत्रालय स्तरावर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कॅन्सर हॉस्पिटललाही सरकारकडून ३ कोटींचा निधी मिळालेला आहे. त्यातून तातडीने कामे केली जातील. कॅन्सर हॉस्पिटलचे इतरही काही प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाईल, असेही पालकमंत्री थोरात यांनी सांगितले.
२९१ कोटींचा आराखडा मान्य
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०१३-१४ सालाच्या वार्षिक योजनेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेचा ९९.२२ टक्के निधी खर्च झाला आहे.
सन २०१४-१५ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा वार्षिक आराखडा २०५ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक योजनेचा आराखडा अनुक्रमे ५७ आणि ८१ कोटी रुपयांचा आहे. या तिन्ही योजनांच्या एकूण २९१ कोटी रुपयांच्या आराखड्यास आजच्या बैठकीत मंजुरी दिल्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.