खिचडी शिजवण्यातून मुख्याध्यापकांची मुक्तता
By Admin | Updated: June 13, 2014 01:11 IST2014-06-13T01:01:08+5:302014-06-13T01:11:32+5:30
औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासह त्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्याची गोड वार्ता शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिली आहे.

खिचडी शिजवण्यातून मुख्याध्यापकांची मुक्तता
औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासह त्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्याची गोड वार्ता शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या प्रारंभीच शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मुख्याध्यापकांना दिली आहे. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहेत.
सहसचिव प्रकाश ठुबे यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून मुख्याध्यापकांना योजनेच्या कामातून मुक्त करण्याची मागणी मुख्याध्यापकांच्या संघटनांनी गेल्यावर्षीपासून लावून धरली होती. त्यासाठी संघटनांनी खिचडी शिजवण्यावर बहिष्कारही घातला होता.
ग्रामीण भागातील शाळांत धान्यसाठा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बचत गटाचीच राहील. तसेच धान्याचा हिशेब बचत गटाने ठेवायचा आहे.
निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा झाल्यास अथवा विषबाधा झाल्यास, शिल्लक माल व नोंदीनुसार मालात तफावत आढळल्यास बचत गटावर कारवाई करण्याबाबतची शिफारस मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयास करावी. अंतिम कारवाई गटशिक्षणाधिकारी करतील.
याबाबत मुख्याध्यापकाला जबाबदार न धरता चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा, असे हे परिपत्रक नमूद करते.
अन्न शिजवणे, स्वयंपाकांची भांडी, ताटांची सफाई व भोजनानंतर शाळेच्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारीही बचत गटावर टाकण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयाचे प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, प्रशांत हिवरडे आदींनी स्वागत केले असून, आता गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांनी कंबर कसावी, असे आवाहनही केले आहे.
बचत गटावर जबाबदारी
मुख्याध्यापकांना शैक्षणिक कामकाजावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी शासनाने पुढाकार घेत खिचडी शिजवण्यासह व्यवस्थापनाची बाजूही बचत गटावर सोपविली आहे. एवढेच नव्हे तर मुख्याध्यापकांची जबाबदारीतून मुक्तताही करण्यात आली आहे.
या परिपत्रकानुसार शाळांत योजनेचा आहार शिजविण्यासाठी बचत गटांची निवड शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे, तर स्वयंपाकी, मदतनिसाची निवड संबंधित बचत गट करील. मालाची मागणी नोंदविणे, माल तपासून ताब्यात घेणे व मालाच्या नोंदी घेणे ही कामे बचत गटाकडे सोपविण्यात आली आहेत. बचत गटाने नोंदविलेली मागणी बरोबर असल्याचे मुख्याध्यापक प्रमाणित करतील.