नातेवाईकांनाच ओढावे लागते ‘स्ट्रेचर’
By Admin | Updated: June 19, 2014 23:56 IST2014-06-19T23:56:09+5:302014-06-19T23:56:09+5:30
उस्मानाबाद : समस्यांनी ग्रस्त असलेल्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात आता रूग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्याची वेळ आली आहे़

नातेवाईकांनाच ओढावे लागते ‘स्ट्रेचर’
उस्मानाबाद : समस्यांनी ग्रस्त असलेल्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात आता रूग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्याची वेळ आली आहे़ ‘सेवक रूग्ण घेऊन गेले आहेत’ ही उत्तरे ऐकून नातेवाईक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी खासगी रूग्णालयात जाणे पसंत केल्याचे चित्र आहे़ विशेष म्हणजे रूग्णांसह नातेवाईकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, यासाठी हजारो रूपये खर्च करून बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर आजघडीला वापराबाहेर गेल्याचे दिसून येते.
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना मिळणाऱ्या सेवा-सुविधांबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत़ समस्यांचे ‘माहेरघर’ बनलेल्या जिल्हा रूग्णालयात सध्या रूग्णांच्या नातेवाईकांवरच स्ट्रेचर ओढण्याची वेळ येत आहे़ सोनोग्राफी, सिटीस्कॅनसह इतर विविध तपासण्या असोत अथवा इतरत्र रूग्णाला नेण्याचे काम असो अनेकवेळा नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागत आहे़ जिल्हा रूग्णालयातील ट्रोमा वॉर्डात गुरूवारी दुपारी हा प्रकार पुन्हा एकदा दिसून आला़ बेंबळी येथील रूग्ण गणी शेख यांच्या पाठीला मार लागल्याने ते जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते़ मात्र, योग्य उपचार होत नसल्याने त्यांनी गुरूवारी दुपारी खासगी रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला़ रूग्ण तेथून बाहेर काढण्यासाठी सेवकच हजर नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर स्वत: ओढत रूग्णास बाहेर आणावे लागले़ शिवाय खासगी टमटममध्ये त्यांनी रूग्ण नेल्यानंतर बाहेर थांबलेले ट्रेचर २५ ते २० मिनिट आहे त्याच जागेत पडून होते़
२० मिनिटानंतर आलेल्या सेवकाने ते स्ट्रेचर आत नेले़ तर आपल्या नातेवाईकासोबत आलेल्या समाधान कानाडे या शिराढोण येथील रूग्णाने एका रूग्णास तेथून स्वत: खुर्चीच्या स्ट्रेचरमधून नेले़ दुपारी जवळपास एक ते दीड तासाच्या कालावधीत अशा पध्दतीने अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनीच स्ट्रेचर ओढत नेल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले़ हजारो रूपये खर्च करून ट्रोमा वॉर्ड व ओपीडी विभागात रूग्णांसह नातेवाईकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टर यंत्रणाही काही दिवसांपासून बंद आहे़ बाहेर रिक्षा पॉर्इंटजवळ बनविण्यात आलेली टाकही कोरडीठाक पडली आहे़ केवळ एकाच टाकीत पिण्याचे पाणी असून, तेथी स्वच्छ आहे की नाही हा प्रश्न कायम आहे़ त्या टाकीच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात घाण साचत असून, त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे़ (प्रतिनिधी)
प्रकार थांबणार कधी ?
स्वत:ची आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा आदी नातेवाईक अजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही काम करण्यास नातेवाईक तयार असतात़ मग स्ट्रेचर ओढण्यासाठी अनेकवेळा शिपाई नसला तरी ते स्वत: स्ट्रेचर ओढत नेतात़ मात्र, रूग्णास उचलून स्ट्रेचरवर ठेवताना घ्यावयाच्या काळजीचे ज्ञान नातेवाईकांना नसते़ त्यामुळे रूग्णास इतर प्रकारची इजा होऊ शकते़ अशा घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सेवकांनाच स्ट्रेचर ओढण्याचे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे़
लिफ्टला मुहूर्त मिळेना
जिल्हा रूग्णालयातील गत अनेक महिन्यांपासून बंद असलेली फिफ्ट सुरू करण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे़ एकच लिफ्ट सुरू असून, अनेक रूग्णांना त्याचाही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ बंद पडलेली फिफ्ट सुरू करण्याबाबत अनेक संघटनांनी तक्रारी, निवेदने दिली़ मात्र, त्या तक्रारी, निवेदनांनाही केवळ केराचीच टोपली मिळाली़ रूग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी बंद पडलेली लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी होत आहे़