नात्यातल्या उलगडल्या रेशीमगाठी!
By Admin | Updated: June 24, 2014 01:07 IST2014-06-24T00:59:00+5:302014-06-24T01:07:08+5:30
औरंगाबाद : नाते कोणतेही असो; पण ते टिकविण्यासाठी पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे असते.

नात्यातल्या उलगडल्या रेशीमगाठी!
औरंगाबाद : नाते कोणतेही असो; पण ते टिकविण्यासाठी पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वीकारल्यास जीवनातील समस्या दूर होतात, असे प्रतिपादन ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील मेघनाच्या सासूबाई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी यांनी केले.
‘लोकमत सखी मंच’ आणि ‘लालचंद मंगलदास सोनी ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘सासू-सून संमेलना’च्या वेळी त्या बोलत होत्या. मालिकेतील सासूचे पात्र साकारत असताना मला माझी आई आणि माझ्या सासूबार्इंची आठवण येते. त्यांना डोळ्यासमोर ठेवून माईची भूमिका मी साकारत आहे, असेही तिने सांगितले.
सासू-सून संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी सखी मंचच्या अध्यक्ष रेखा राठी, अनिता कोटगिरे, लालचंद मंगलदास सोनी ज्वेलर्सचे उदय सोनी, वैशाली सोनी यांची उपस्थिती होती. संमेलनात प्रथम परिचय फेरी घेण्यात आली. यात सासूने सुनेचा, तर सुनेने सासूचा परिचय करून द्यायचा होता. या फेरीत एकूण ३१ सासू-सुनांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या अनोख्या शैलीत परिचय करून दिला. यावेळी सासू-सुनेचे नाते आई-मुलीसारखे, तर काही घरात मैत्रिणीसारखे असल्याचे दिसून आले. साठ वर्षांच्या सासूबाई के वळ आपल्या आग्रहाखातर स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तयार झाल्या, असेही यावेळी सांगण्यात आले. काहींनी तर सासू-सुनेच्या नात्यावर कविताही सादर केल्या.
परिचय फेरीमध्ये सहभागी सासू-सुनांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. या फेरीमध्ये निवडक सासू-सुनांनाच सहभागी होण्याचा आनंद घेता आला. या स्पर्धेमध्ये फनी गेम घेण्यात आले. या गेमचा आनंद स्पर्धकांबरोबरच उपस्थित सखींनीही घेतला.
या फेरीनंतर सुकन्या कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी यांच्याशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सूत्रसंचालन करणाऱ्या नीता पानसरे यांनी दोघींशी संवाद साधला. कार्यक्रमास उपस्थित महिलांचा प्रतिसाद बघून मेघनाला म्हणजे प्राजक्ता माळीला जागरची आठवण झाल्याचे तिने नमूद केले. यावेळी दोघींच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला.
विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेची अंतिम फन फेरी घेण्यात आली. सखींनीही टाळ्यांसह प्रतिसाद दिला. कार्यक्रमात शेवटपर्यंत महिलांचा उत्साह कायम होता. यावेळी सखी मंचच्या कमिटी मेंबर मनीषा सोनी, गीता सी. अग्रवाल, गीता अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
लकी ड्रॉ विजेत्यांची नावे
प्रथम- भारती मस्के
द्वितीय- संध्या निंबाळकर
तृतीय- माया चिंचोले
संमेलनाच्या विजेत्या
मुक्ता व सुमंत उदावंत- प्रथम
सीमा व शोभा अजमेरा- द्वितीय
अंजली व सुलोचना सेवेकर- तृतीय