फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:52 IST2019-01-22T21:51:06+5:302019-01-22T21:52:12+5:30
बनावट कागदपत्रांआधारे नोकरी मिळवून तसेच विभागीय चौकशी अहवालातही फेरफार करुन खंडपीठात बनावट अहवाल दाखल केल्याच्या गुन्ह्यातील ‘वाल्मी’चा निलंबित कर्मचारी प्रा. वृषसेन पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला.

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
औरंगाबाद : बनावट कागदपत्रांआधारे नोकरी मिळवून तसेच विभागीय चौकशी अहवालातही फेरफार करुन खंडपीठात बनावट अहवाल दाखल केल्याच्या गुन्ह्यातील ‘वाल्मी’चा निलंबित कर्मचारी प्रा. वृषसेन पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २२ जानेवारी) फेटाळला.
या संदर्भात महासंचालकांच्या वतीने वाल्मीचे कर्मचारी सुर्यकांत धनशेट्टी (५७, रा. वाल्मी वसाहत) यांनी फिर्याद दिली होती की, प्रा. वृषसेन पवार (रा. पारिजातनगर, सिडको एन-४) याने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली. यासंदर्भात १३ जुलै २०१८ रोजी प्रमोद मांडे यांनी तक्रार दिल्यावरुन विविध कलमान्वये सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महासंचालकांनी आरोपीला १५ सप्टेंबर २०१८ रोजी पाठविलेल्या कार्यालयीन चौकशीच्या अहवालातही आरोपीने फेरफार करुन बनावट अहवाल खंडपीठात सादर केला आणि वाल्मीसह खंडपीठाचीही दिशाभूल केली. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी केली असता न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.