पशुवैद्यकीय विभागाची पुनर्रचना होणार
By Admin | Updated: March 29, 2016 23:51 IST2016-03-29T23:45:09+5:302016-03-29T23:51:25+5:30
रामेश्वर काकडे, नांदेड आवश्यकता असलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय अद्ययावत सुविधा देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय विभागाची पुनर्रचना होणार
रामेश्वर काकडे, नांदेड
आवश्यकता असलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय व्हावी, त्यात सुधारणा करुन अद्ययावत सुविधा देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे काही दवाखान्यांचे स्थलांतर तर काही ठिकाणच्या दवाखान्यांना दर्जावाढ मिळणार आहे.
यासंदर्भात नुकतीच राज्यस्तरावर सचिवस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीमार्फत जिल्हाभरातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांची तपासणी करुन त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यांना दर्जावाढ, कर्मचारी भरती, स्थलांतरण प्रक्रिया, नवीन मंजुरी अशी पुनर्रचना होणार आहे. यापूर्वीही २००४ मध्ये पशुुवैद्यकीय विभागाची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यात तालुक्याच्या ठिकाणी नवीन दवाखान्यांना मान्यता देवून अनेक पदांनाही मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल १२ वर्षानंतर पुनर्रचना होणार असल्याने पशुपालकांना अद्ययावत सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
पुनर्रचनेसाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला असला तरी अद्याप त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली नाहीत. लहान दवाखान्याचे मोठ्या दवाखान्यात रुपांतर तसेच त्यांच्या दर्जात वाढ होईल. तालुक्यातील उपलब्ध पशुंच्या संख्येनुसार नवीनला मंजुरी देण्यात येणार असून ज्या ठिकाणी जास्तीचे दवाखाने आहेत, त्यांचे नसलेल्या ठिकाणी स्थलांतर होण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यात अर्धापूर, नायगाव, धर्माबाद, देगलूर व कंधार या पाच तालुक्यात तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये आहेत. परंतु त्यात केवळ सहाय्यक आयुक्त-१, पशुधन विकास अधिकारी-१, पशुधन पर्यवेक्षक, पट्टीबंधक-१ व परिचर-१ अशी चारच पदे मंजूर आहेत. त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत सुविधा असुनही अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी ते देणे अशक्य झाले आहे. जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात १४ पदे मंजूर असूनही त्यापैकी बहुतांश रिक्त आहेत. जिल्ह्यात ८ लाख ५० हजार पशुधनासाठी केवळ १८४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यात राज्य शासनाचे १ जिल्हस्तरीय पशुवैद्यकीय चिकित्सालय, ५ तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय तर जिल्हा परिषदेचे श्रेणी-१ चे ७५ पशुवैद्यकीय दवाखाने ,श्रेणी-२ चे- १०३, फिरते-१ असे एकूण १७९ दवाखान्यांची संख्या आहे.पशुंच्या तुलनेत दवाखान्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे.