दोन हजार नवीन मतदारांची नोंदणी
By Admin | Updated: August 4, 2014 01:56 IST2014-08-04T01:42:16+5:302014-08-04T01:56:18+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त लोकांची मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आज रविवारी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली आहे.

दोन हजार नवीन मतदारांची नोंदणी
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त लोकांची मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आज रविवारी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात २०८३ जणांनी मतदार नोंदणीचे अर्ज भरून दिले. यापैकी १५३९ अर्ज हे औरंगाबाद शहरातून आले आहेत.
निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी जून महिन्यात संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला. त्यानंतर ३१ जुलै रोजी विधानसभानिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तरीही खूप लोक मतदार नोंदणी करायचे राहून गेले असल्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणी मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याअंतर्गत आज रविवारी सर्व मतदान केंद्रांवरही ही मोहीम दिवसभर सुरू होती.
नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना केंद्रांवर दिवसभर बसविण्यात आले होते. या मोहिमेत आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण २०८३ जणांनी अर्ज भरून दिले.
औरंगाबाद शहरात मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात दिवसभरात १५३९ अर्ज आले. यामध्ये मध्य मतदारसंघात ६८६, पश्चिम मतदारसंघात ४११ आणि पूर्व मतदारसंघात ४४२ जणांनी नोंदणी अर्ज भरून दिल्याची माहिती निवडणूक शाखेच्या वतीने देण्यात आली.