बनावट पदवीवर पीएचडीला प्रवेश घेणाऱ्यावर गुन्हा नोंदवा; रिपाईचे ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन
By राम शिनगारे | Updated: July 24, 2025 17:46 IST2025-07-24T17:45:37+5:302025-07-24T17:46:17+5:30
बनावट पदवीच्या आधारे प्रवेश घेणाऱ्यास विद्यापीठ पाठिशी घालत असल्याचा आंदोलकांचा आरोप

बनावट पदवीवर पीएचडीला प्रवेश घेणाऱ्यावर गुन्हा नोंदवा; रिपाईचे ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बनावट कागदपत्राच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेणाऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी रिपाई (आठवले) पक्षातर्फे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन गुरूवारी (दि.२४) सकाळी करण्यात आले.
रिपाई (आठवले) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष नगराज गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्दीकी मोहम्मद शोएब मोहम्मद हबीबुद्दीन या विद्यार्थ्याने वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या बी.एससी. व एम.एससी.ची बनावट गुणपत्रके आणि पदव्या तयार करून विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयात ‘पेट’च्या माध्यमातुन पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. याविषयी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाने वाराणसीच्या विद्यापीठाकडे पदव्यांची पडताळणी केली असता ३० जून २०२५ राेजी पदव्या बनावट असल्याचे कळविले. त्यानुसार विद्यापीठ ८ जुलै २०२५ रोजी त्याची पीएच.डी.ची नोंदणी रद्द केली. मात्र, अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेणारे कोहिनुर संस्थेचे आस्मा खान आणि मकसूद खान यांच्या विरोधात २६ मार्च रोजी विद्यापीठाने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पीएच.डी.ची नोंदणी रद्द केली.
अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्या
मात्र, सिद्दीकी प्रकरणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे हे त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गायकवाड यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देण्यासाठी ‘साष्टांग दंडवत’ आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ गेटपासून आंदोलनाला सुरूवात केल्यानंतर काही अंतरावर पोलिसांनी अडवत आंदोलनकर्त्यांना बेगमपुरा पोलिस ठाण्यात नेले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करून आंदोलकांना सोडून देण्यात आले. यावेळी प्रशांत वाहुळे, विकास राऊत, अश्वीन मेश्राम, मंगेश भवरे, नितीन कांबळे, सिद्धार्थ खोतकर, अनिल आगळे, आनंद शिंदे, किरण मगरे, नितीन साळवे, चेतन जाधव इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वाराणसी विद्यापीठास कळवले
विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्याची पीएच.डी.नोंदणी रद्द केली. तसेच वारणसीच्या विद्यापीठाला संबंधितवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविले. आता त्या विद्यापीठाने संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी. यासंदर्भात पोलिस आयुक्तांनाही पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी कळविले आहे.