छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून सकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची हैदराबादची विमानसेवा मंगळवारपासून बंद झाली. त्यामुळे आता हैदराबादला जाण्यासाठी केवळ सायंकाळच्या वेळेत विमानसेवा उपलब्ध आहे. गेल्या दीड वर्षांत शहरातून बंद होणारी ही तिसरी विमानसेवा ठरली आहे. दिवसभरात एकच विमानसेवा राहिल्याने प्रवाशांना आता हैदराबादसाठी ४ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत तिकीट दर मोजावे लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगरहून सकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची हैदराबादची विमानसेवा मंगळवारपासून बंद करण्यात आली. ही विमानसेवा ‘ऑपरेशनल रिझन’मुळे १ जुलै ते २५ ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात येत असल्याचे कारण इंडिगोने दिले आहे. ही विमानसेवा बंद झाल्याने आता एका दिवसात हैदराबादला ये-जा करता येणार नाही. हैदराबादला जाण्यासाठी सायंकाळची विमानसेवा उपलब्ध राहील. म्हणजे शहरातून हैदराबादला गेल्यानंतर प्रवाशांना मुक्काम करावाच लागेल. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
शहराच्या कनेक्टिव्हिटीत घटछत्रपती संभाजीनगरहून महिन्याला ७ हजारांवर प्रवासी विमानाने हैदराबादला ये-जा करीत होते. आता एक विमान बंद झाल्याने हैदराबादला ये-जा करणाऱ्या विमान प्रवाशांमध्ये ५० टक्के घट होणार आहे.
यापूर्वी कोणते विमान बंद?डिसेंबर २०२४ मध्ये अहमदाबाद विमानसेवा बंद झाली. त्यानंतर नागपूर-लखनऊ विमानसेवा मार्च २०२५ मध्ये बंद झाली. आता इंडिगोचे हैदराबादचे विमान बंद झाले.
इंडिगोला निवेदनहैदराबादची सकाळची विमानसेवा बंद होणे, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ही विमानसेवा बंद झाल्याने हैदराबादचे विमान भाडे वाढले आहे. इंडिगोचे हे पाऊल शहरातील प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाईसारखे वाटते, ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून इंडिगोला सातत्याने पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात इंडिगोला निवेदन दिले आहे. ग्राहकांच्या विश्वासाला यामुळे तडा जात आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)