पूर्णाकृती पुतळ्याला ‘लाल फिती’चा अडसर
By Admin | Updated: August 1, 2014 00:27 IST2014-08-01T00:03:37+5:302014-08-01T00:27:30+5:30
उस्मानाबाद : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्वत:ला वाहून घेणारे आणि समाज प्रबोधनासाठी आयुष्य वेचणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला ‘लालफिती’चे ग्रहण लागले आहे़
पूर्णाकृती पुतळ्याला ‘लाल फिती’चा अडसर
उस्मानाबाद : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्वत:ला वाहून घेणारे आणि समाज प्रबोधनासाठी आयुष्य वेचणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला ‘लालफिती’चे ग्रहण लागले आहे़ विविध संघटनांनी शहरात पुतळा उभारणीच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली, हजारो निवेदने दिली मात्र, अपेक्षित यश मिळालेले नाही. या पुतळा उभारणीसाठी आता पदाधिकाऱ्यांनीच पाठपुरावा करण्याची गरज आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रारंभीच्या काळात ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे़’ या त्यांच्या क्रांतीकारी विचारांनी अनेकांना प्रेरणा दिली़ अण्णाभाऊंची ‘फकिरा’ ही कादंबरी अनेकांना भावली़ साहित्य क्षेत्रात असे मोलाचे काम करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचा उस्मानाबाद शहरात पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ शहरातील आडतलाईनजवळ चौकात अण्णा भाऊंचा पुतळा उभारावा, यासाठी आंदोलनांसह निवेदनांचा पाऊस पालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाडण्यात आला आहे़ मात्र, ही निवेदने, मागण्या केवळ कागदावरच राहिल्या़ मागणीचा रेटा पाहता डीपीटीसीच्या बैठकीत जवळपास तीन वर्षापूर्वी १५ लाख रूपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे़ सर्वांच्या मागणीनुसार पुतळ्यासाठी आडतलाईनजवळील जागाही आरक्षित करण्यात आली आहे़ मात्र, बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून अद्याप नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. आता पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
ना हरकत प्रमाणपत्र
पोलिस प्रशासनाने पुतळा संरक्षणाची जबाबदारी घेण्याबाबत पालिकेस पत्र दिले होते़ त्यानुसार पालिकेच्या बैठकीत देखभाल-दुरूस्ती आणि संरक्षणाबाबत ठराव घेण्यात आला आहे़ पुतळा समितीला याबाबत माहिती देण्यात आली असून, पोलिस अधीक्षकांकडे तो प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ पोलिस अधीक्षकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदरील प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे़ नाहकरत प्रमाणपत्र व शासनाकडून लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दत्ता पेठे यांनी सांगितले़
नवीन प्रस्ताव
नगर पालिकेने यापूर्वी पोलिसांकडे पाठविलेला प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता़ न्यायालयानेही महामार्गासंदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत़ तरी पालिकेने पुतळ्यासंदर्भात नवीन ठराव घेतला असून, देखभाल-दुरूस्ती पालिकेकडे व संरक्षणासाठी समितीचे गठण करण्याबाबत सूचित केले आहे़ समिती गठण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार असल्याचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांनी सांगितले़
संरक्षणाची जबाबदारी समितीकडे
पालिकेने घेतलेल्या ठरावात पुतळा उभारल्यानंतर देखभाल-दुरूस्ती करण्याची जबाबदारी पालिकेने स्विकारली आहे़ मात्र, पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी एक पुतळा समितीने समिती नेमावी, असे ठरावात म्हटले आहे़ त्यानुसार पुतळा संरक्षण समितीचे गठण करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे़