महागाईचा तडका! किलोभर लाल मिरचीला मोजा तब्बल हजार रुपये
By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 4, 2022 11:54 IST2022-11-04T11:49:54+5:302022-11-04T11:54:35+5:30
मागील हंगामात अतिपावसाचा फटका मिरची उत्पादक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांना बसला होता.

महागाईचा तडका! किलोभर लाल मिरचीला मोजा तब्बल हजार रुपये
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : लाल मिरचीचा झणझणीतपणा आता अजूनच वाढला असून ती बाजारात थेट २६ हजार ते एक लाख रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच लाल मिरची एवढी तेजतर्रार झाली आहे.
एक लाख रुपयांत रसगुल्ला मिरची
खान्देशातून येणारी रसगुल्ला लाल मिरची चक्क ९५ हजार रुपये ते एक लाख रुपये क्विंटल भावाने विकली जाते आहे. ही मिरची दिसण्यास एकदम लाल भडक असते; पण तिखटपणा कमी असतो. यामुळे त्यास रसगुल्ला लाल मिरची म्हटले जाते. मागील हंगामात ही मिरची ४० हजार ते ४५ हजार रुपये क्विंटल विकली होती. महाग असल्याने व्यापाऱ्यांनी रसगुल्ला मिरची खरेदी करणे बंद केले आहे.
बेडगी अर्ध्या लाखात
कनार्टक राज्यात बेडगी नावाचे गाव आहे. तेथून बेडगी लाल मिरची बाजारात येते. आजघडीला ही मिरची ४७ हजार ते ५१ हजार रुपये दराने प्रति क्विंटल विकली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी याच मिरचीचे भाव ३० हजार ते ३५ हजार रुपये होते.
शहरात ८० टक्के नागरिक खातात गुंटूर मिरची
शहरात तिखट, झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकूण विक्रीपैकी ८० टक्के नागरिक आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीचे तिखट खातात. १८ हजार ते २० हजार रुपये क्विंटलने विकणारी ही मिरची सध्या ३१ हजार रुपये ते ३२ हजार रुपये क्विंटल दराने मिळत आहे.
का महागली मिरची?
नवीन मिरचीचा हंगाम ‘मार्च’ ते ‘मे’ हे तीन महिने असतो. मागील हंगामात अतिपावसाचा फटका मिरची उत्पादक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांना बसला होता. मिरचीचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले होते. सध्या बाजारात शीतगृहातील लाल मिरचीची आवक होत आहे. नवीन लाल मिरची येण्यासाठी आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. मिरची पावडर बनविणाऱ्या कंपन्याकडून लाल मिरचीला मागणी वाढल्याने भाव कडाडले.
हंगामात महिनाभरात ३० ते ४० टन विक्री
मार्च ते मे महिन्यात लाल मिरचीचा हंगाम असतो. या काळात दर महिन्याला ३० ते ४० टन लाल मिरची विकली जाते. एरव्ही लाल मिरचीपेक्षा रेडिमेड मिरची पावडर जास्त विकल्या जाते.
लाल मिरचीचे भाव वाचून तुमचे डोळे पांढरे होतील.
लाल मिरची.........सप्टेंबर.................नोव्हेंबर
गुंटूर...........१८,००० ते २०,०००......३१,००० ते ३२,०००
तेजा...........१८,००० ते २०,०००.......२६,५०० ते २८,०००
ब्याडगी.......३०,००० ते ३५,०००.......४७,५०० ते ५१,०००
रसगुल्ला......४०,००० ते ४५,०००.....९५,००० ते १,००,०००
लाल मिरचीचे प्रतिकिलो दर
गुंटूर : ३४० रुपये
तेजा : ३२० रुपये
बेडगी : ५६० रुपये
चपाटा : ४२० रुपये