मनपा उभारणार सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्रकल्प
By Admin | Updated: May 8, 2017 00:27 IST2017-05-08T00:26:12+5:302017-05-08T00:27:22+5:30
लातूर : लातूर शहर मनपाच्या वतीने १२० कोटी रुपये खर्चून शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या ५ नाल्यांवर पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

मनपा उभारणार सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूर शहर मनपाच्या वतीने १२० कोटी रुपये खर्चून शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या ५ नाल्यांवर पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अमृत योजनेतून ५० टक्के, राज्य सरकार २५, तर मनपाच्या निधीतून २५ टक्के खर्च या प्रकल्पावर केला जाणार आहे.
२०१७-१८ च्या कृती आराखड्यात याचा समावेश करण्यात आला असून, १२० कोटी रुपयांत हा प्रकल्प उभा केला जाणार आहे, अशी माहिती स्थायीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. भुयारी गटार व सांडपाण्यावरील ७५० कोटींचा आराखडा मनपाने तयार केला होता. त्यापैकी सांडपाण्यावरील प्रक्रियेकरिता १२० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा केला जाणार आहे. शहरातील सिद्धेश्वर मंदिर, मंत्री नगर, कव्हा रोड आदी ठिकाणच्या नाल्यांद्वारे सांडपाणी शहराबाहेर सोडले जाते. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते. शेतीचेही नुकसान होते. यावर उपाय म्हणून आता या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाईल. हे पाणी पुन्हा वापरात आणले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प कार्यान्वय यंत्रणा असेल, असेही सभापती गोजमगुंडे यांनी सांगितले.