वसुली थंडावली
By Admin | Updated: December 28, 2015 00:23 IST2015-12-28T00:00:07+5:302015-12-28T00:23:16+5:30
राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे.

वसुली थंडावली
राजेश खराडे , बीड
महावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे. महिन्याकाठी सरासरी इतकीही वसुली होत नसल्याने थकबाकीचा आकडा एक हजार कोटी १९ लाख एवढा फुगला आहे.
बीले अदा होत नसल्यानेच भारनियमनाची नामुष्की येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे सुरळीत सेवाच मिळत नसल्याचा ग्राहकांचा ठपका आहे. वाढती थकबाकी आणि ग्राहकांना मिळणारी सेवा याचा ताळमेळ लागत नसल्याने सध्या महावितरण कार्यालयाची कोंडी झाली आहे. जिल्ह्यात घरगुती, कृषी, व्यापारी, औद्योगिक, पाणी पुरवठा विभाग, पथदिवे आदी विभगातील ग्रहकांची संख्या दोन लाखांच्या घरात असून थकबाकी एक हजार ६३ कोटी ५२ लाख ऐवढी आहे. अंबाजोगाई व बीड अर्बन वगळता विभगाला महिन्याकाठी सरासरी इतकी वसुली करण्यास यश मिळालेले नाही.
वसुलीत अडथळा
थकबाकीचा वाढता आकडा हाच ग्रहकांना सेवा देण्यास कारणीभूत ठरत आहे. विज बीलाचे वाटप करण्याचे काम नेमूण दिलेल्या एजन्सी करीत आहेत. वसुलीचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. महिन्याकाठी सर्वाधिक तक्रारी या बिले वेळेवर मिळत नसल्याच्या आहेत. त्यामुळे वसुलीकरिता एक ना अनेक मोहिमा राबवूनही समाधानकारक वसुली होत नाही. एजन्सीकडून नियमित बिलांचे वाटप व बिले अदा करण्याविषयी ग्राहकांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
पुरवठा विभागाकडून दुजाभाव
विभागाकडून उत्पन्न तर सोडाच अधिकचा तोटा सहन करावा लागत असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून साहित्य पुरविण्यास दुजाभाव केला जात आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रत्येक विभागाला १०० रोहित्रे दिली जातात. असे असतानाही यंदा बीड विभागाला केवळ १० रोहित्रांची बोळवण केली होती. शिवाय गुत्तेदारांचेच पैसे महावितरणकडे असल्याने दोन वर्षापासून लहान-मोठी दुरूस्तीची कामे रखडलेली आहे. साहित्याचा पुरवठा होत नसल्यानेच दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत.
रोहित्रांचा प्रश्न कायम
बारमाही रोहित्रांचा प्रश्न कायम राहिलेला आहे. हंगामी काळात विभागाला ४०० रोहित्रांची आवश्यकता होती. तशी मागणीही विभागीय कार्यालयाकडून करण्यात आलेली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर याची पूर्तता हंगाम संपत आला तरी झालेलीच नाही. त्यामुळे थोड्या-बहूत प्रमाणावर पाणी असतानाही शेतकरी हतबल झाले होेते. रबी हंगामाच्या अंतिम टप्प्यात विभागाला केवळ २० रोहित्रांची बोळवण करण्यात आलेली होती.
पोकळ आश्वासने
उर्जामंत्र्याच्या आढावा बैठकीत योजना आणि आश्वासंनाचा झालेला पाऊस प्रत्यक्षात मात्र बरसलाच नाही. पंधरा दिवसांत रिक्त पदे भरून दोन दिवसांत २०० रोहित्र देणार असल्याचे उर्जामंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत सांगितले होते. त्यापैकी आठ दिवसांपूर्वी परभणी येथून १० व पुणे विभागाकडून १० अशी २० रोहित्रे देण्यात आलेली आहेत.