बौद्धधम्माच्या वाटेवरचा ‘विद्रोही’ हरवला !
By Admin | Updated: March 19, 2015 23:56 IST2015-03-19T22:40:26+5:302015-03-19T23:56:15+5:30
प्रताप नलावडे, बीड हनुमंत बाबूराव उपरे! जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर समाजात बदल घडविण्याची ऊर्मी बाळगून काम करणारा बीड जिल्ह्याच्या मातीत घडलेला

बौद्धधम्माच्या वाटेवरचा ‘विद्रोही’ हरवला !
प्रताप नलावडे, बीड
हनुमंत बाबूराव उपरे! जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर समाजात बदल घडविण्याची ऊर्मी बाळगून काम करणारा बीड जिल्ह्याच्या मातीत घडलेला रांगडा गडी. ओबीसी समाजातील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला हनुमंत नावाचा हा तरुण एक दिवस राज्य पातळीवर नेतृत्व करेल असे पाच दशकांपूर्वी कोणी म्हटले असते तर कोणाचाच विश्वास बसला नसता. मात्र, उपरे यांनी अतिशय संघर्षातून मोठी झेप घेतली. दीनदुबळ्यांचा आवाज बनून त्यांनी परिवर्तनवादी चळवळ गतिमान केली होती. ओबीसी लाचार होऊन कधीच जगू शकणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी ओबीसींत स्वाभिमानाचा हुंकार जागवत प्रस्थापितांना हादरे दिले होते. उपरे यांच्या अचानक जाण्याने बौद्धधम्माच्या परिवर्तनवादी प्रवासातील विद्रोही वाटसरु हरवल्याने ओबीसी समाजाची मोठी हानी झाली आहे.
२ जून १९५२ रोजी हनुमंत उपरे यांचा जन्म झाला. परिस्थिती बेताचीच होती. बी.एस्सी. चे शिक्षण घेऊन ते प्राध्यापक झाले; परंतु लाचार होऊन नोकरी करणे त्यांना मान्य नव्हते. दुसऱ्याच क्षणी त्यांनी राजीनामा फेकला. त्यानंतर त्यांनी एलआयसी एजंट म्हणून चार वर्षे काम केले. इतरांच्या जीवनाला विम्याचे सुरक्षाकवच देतानाच त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे स्वप्नही रंगवले. १९८५ मध्ये त्यांनी बीड पालिकेची निवडणूक लढविली अन् जिंकलीही! पुढे पाणीपुरवठा सभापती होण्याचा मानही त्यांना मिळाला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.
यादरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रात पाऊल ठेवले. पाईप निर्मिती कारखाना व बँकेची स्थापना करुन गोरगरिब व होतकरुंना संधी उपलब्ध करुन दिली. यातून हजारोंचे संसार उभे राहिले. उद्योगात जम बसवितानाच त्यांनी सामाजिक चळवळीलाही उभारी दिली.
१९८८ मध्ये ते भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात आले. तब्बल २२ वर्षे त्यांनी भारिपमध्ये काम केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषविली. यानिमित्ताने त्यांनी राज्यभर कार्यकर्ते उभे केले. बीडमधील सामान्य तरुण राज्याचा नेता कधी झाला ते कळलेच नाही.
२०११ मध्ये हनुमंत उपरे यांनी सत्यशोधक ओबीसी परिषदेची स्थापना केली. याचवेळी त्यांनी तमाम ओबीसींना ‘घरवापसी’चे (बौद्ध धम्माच्या वाटेवर चालण्याचे) आवाहन करत कर्मकांडात होत असलेल्या पिळवणुकीची आठवण करुन दिली. सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील शिलेदार म्हणून त्यांनी संपूर्ण समाज ढवळून काढला. बौद्ध धम्मात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करुन त्यांनी स्वत:पासून सुरुवातही केली होती. १४ आॅक्टोबर २०१५ मध्ये ते ५०० जणांना बौद्धधम्माची दिक्षा देणार होेते. शिवाय १४ आॅक्टोबर २०१६ मध्ये ते स्वत: बौद्ध धम्मात प्रवेश करणार होते. परिवर्तनवादी विचारांना मूर्त स्वरुप देण्यासाठी त्यांनी विखुरलेल्या ओबीसींना एका छत्रात आणण्याचे मोठे काम हाती घेतले होते. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन जातीअंताचा लढा तीव्र केला होता.
ओबीसींचे हित केवळ बौद्धधम्मातच आहे, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यासाठी ते रात्रंदिवस झटत असत. परिवर्तनाची त्यांनी पेटवलेली ज्योत ‘अंगार’ बनून खवळत होती. त्यांच्या निधनाने ओबीसींच्या न्याय-हक्कासाठी भांडणारा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये हनुमंत उपरे यांच्या पुढाकारातून बीड येथे विद्रोही साहित्य संमेलन पार पडले होते. प्रस्थापित साहित्यिकांना धक्के देत परिवर्तनवादी साहित्यिकांचे विचार तळागाळात पोहोचहविण्यासाठी उपरे कायम आग्रही होते. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी संमेलनादरम्यान कुठलीही उणीव राहणार नाही, याची दक्षता घेतली होती. साहित्यावर विशिष्ट प्रवर्गाचे वर्चस्व असू शकत नाही, जे भोगले ते साहित्यातून पुढे आले तर अधिक दर्जेदार असू शकते हा विश्वास ते कित्येकदा बोलून दाखवत. त्यांनी स्वत: ‘ओबीसींना पर्याय धर्मांतर’, ‘हिंदुस्थानातील भारत’, ‘ओबीसी जात सोडतो तेंव्हा...’, ‘मराठा आरक्षण भ्रम व वास्तव’ ‘मी ओबीसी बोलतोय..’ या पुस्तकातून त्यांनी धगधगता विचार दिला.