‘लालपरी’सोबतच खरी दिवाळी; कर्तव्यावरील चालक-वाहकांचे आगारातच अभ्यंगस्नान, फराळ
By संतोष हिरेमठ | Updated: November 13, 2023 15:10 IST2023-11-13T15:05:23+5:302023-11-13T15:10:01+5:30
आगारात अभ्यंगस्नान, फराळाचे वाटप; कुटुंबीयांसोबतच दिवाळी साजरी करण्याची अनुभूती

‘लालपरी’सोबतच खरी दिवाळी; कर्तव्यावरील चालक-वाहकांचे आगारातच अभ्यंगस्नान, फराळ
छत्रपती संभाजीनगर : सुगंधी साबण, उटणे आणि गरम पाण्याने अभ्यंगस्नान... त्यानंतर खमंग फराळाचा आस्वाद... अगदी घरीच कुटुंबीयांसोबतच दिवाळी साजरी करीत असल्याची अनुभूती रविवारी प्रवाशांसाठी कर्तव्यावर असलेल्या ‘एसटी’च्या चालक- वाहकांना आली.
एसटी महामंडळातर्फे रविवारी पहाटे मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात दिवाळी साजरी करण्यात आली. पहाटे एसटी चालक- वाहकांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यांना उटणे, सुगंधी तेल, साबण, आंघोळीला गरम पाणी देण्यात आले. फराळाचे वाटप करण्यात आले. एसटी महामंडळ प्रशासनाने केलेल्या या आदरातिथ्यामुळे कर्मचाऱ्यांना सुखद धक्का मिळाला.
सिडको बसस्थानकात पहाटे ५:३० वाजता विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते मुक्कामी असलेल्या चालक- वाहकांना फराळाचे वाटप करण्यात आले. विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अंबादास घोडके, कामगार अधिकारी विनायक आंबट, आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
‘लालपरी’सोबतच खरी दिवाळी
दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने जादा बससेवा देण्याचे नियोजन केले. एसटीचा चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांची दिवाळी चार चाकांवर धावणाऱ्या एसटी आणि त्यातील प्रवाशांच्या सेवेत निघून जाते. मात्र, प्रवासी सेवेत आणि ‘लालपरी’सोबतच दिवाळीचा खरा आनंद असल्याचे चालक- वाहकांनी म्हटले.