पुरवठ्याच्या यादीचे होणार चावडी वाचन
By Admin | Updated: September 15, 2014 00:27 IST2014-09-15T00:25:28+5:302014-09-15T00:27:00+5:30
चेतन धनुरे, उदगीर उदगीरच्या पुरवठा विभागातील अनागोंदी ‘लोकमत’ने उजेडात आणताच महसूल प्रशासनाला जाग आली आहे़

पुरवठ्याच्या यादीचे होणार चावडी वाचन
चेतन धनुरे, उदगीर
उदगीरच्या पुरवठा विभागातील अनागोंदी ‘लोकमत’ने उजेडात आणताच महसूल प्रशासनाला जाग आली आहे़ शनिवारी तहसीलदारांनी पुरवठ्याच्या यादीचे चावडीवाचन करण्याच्या सूचना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ त्यात अतिरिक्त निघणारी नावे वगळण्यात येतील़, असे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले़
‘लोकमत’ने मागील तीन दिवसांपासून पुरवठा विभागाच्या यंत्रणेतील दोषांवर प्रकाश टाकला होता़ प्रत्यक्ष रेशन कार्डावर लाभार्थ्यांची कमी नावे असतानाही वितरणाच्या यादीत मात्र संख्येत वाढ करुन अतिरिक्त धान्य मागविले जात होते़ शिवाय, धान्य वितरणाच्या गोदामातही मापात पाप करुन लूट केली जात होती़ या विषयावर सविस्तर प्रकाश टाकल्यानंतर मालिकेची दखल घेत महसूल प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे़ उपविभागीय अधिकारी विकास खरात यांनी तहसीलदारांना चौकशीच्या सूचना केल्या होत्या़ त्याअनुषंगाने शनिवारी तहसीलदारांनी लेखी आदेश काढून पुरवठ्याच्या यादीचे गावात जाऊन चावडी वाचन करण्याचे निर्देश मंडळ अधिकारी, तलाठ्यांना दिले आहेत़ शिवाय, गोदामात वजनकाट्यात तूट पाडली जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ गोदामात इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्याची प्रक्रिया तातडीने व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्यात येणार असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले़ तसेच खाजगी व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले़
चार दिवसांची मुदत़़़
पुरवठ्याच्या यादीतून अतिरिक्त नावे कमी करण्याच्या अनुषंगाने तलाठी व मंडळ अधिकारी चावडी वाचन करणार आहेत़ त्यासाठी त्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ चार दिवसांत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़ या प्रक्रियेत यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासोबतच जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई होणार आहे़