रेशन कार्डांचेही आता आधार लिंक
By Admin | Updated: January 20, 2015 01:28 IST2015-01-20T01:21:03+5:302015-01-20T01:28:52+5:30
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात गॅस कनेक्शननंतर आता रेशन कार्डांचे आधारशी लिंक करण्याचे सुरू झाले आहे.

रेशन कार्डांचेही आता आधार लिंक
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात गॅस कनेक्शननंतर आता रेशन कार्डांचे आधारशी लिंक करण्याचे सुरू झाले आहे. सर्व रेशन कार्डधारकांकडून त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक घेऊन ते रेशन कार्डशी लिंक केले जाणार आहेत. त्यासाठी रेशन दुकानदारांकडे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले.
राज्य सरकारने निराधार लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ‘आधार’ कार्डबरोबर लिंक केल्या आहेत. त्यामुळे लाभार्थीचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांचे आधार लिंक करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात गॅस कनेक्शनही आधारशी लिंक करण्याची मोहीम राबविण्यात आली. आता शासनाने रेशन कार्डही आधार कार्डांशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे बोगस रेशन कार्डांना आळा बसणार आहे. जिल्ह्यातील रेशन कार्डांचे डिजिटायझेशन करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यामुळे आता रेशन कार्डधारकांकडून त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक घेऊन ते रेशन कार्डशी संलग्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व १७१७ रेशन दुकान चालकांना त्यासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सर्वच प्रकारचे रेशन कार्ड आधार कार्डांशी लिंक केले जाणार आहेत. त्यासाठी दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कार्डधारकांना प्रत्येकी शंभर रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
४सर्व कार्डधारकांना त्यांच्या रेशन दुकानांवर आधार आणि बँक खाते क्रमांक द्यावयाचा आहे. हे काम करण्यासाठी लाभार्थ्यांचा वेळ जाणार आहे.
४परिणामी गरीब लाभार्थ्यांची त्या दिवसाची मजुरी बुडणार आहे. म्हणून शासनाकडून हे शंभर रुपयांचे अनुदान प्रोत्साहन भत्ता म्हणून त्याला दिले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले.
४जिल्ह्यात बीपीएलचे एकूण १ लाख ५७ हजार कार्ड असून, त्यांच्या लाभार्थ्यांची संख्या १० लाख ७ हजार इतकी आहे.