corona virus : कोरोना उपाययोजनेतील अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राकडे बोट - रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 19:06 IST2021-05-08T19:05:33+5:302021-05-08T19:06:20+5:30
corona virus : केंद्राने मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यास दिरंगाई

corona virus : कोरोना उपाययोजनेतील अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राकडे बोट - रावसाहेब दानवे
पैठण : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे माहित असताना सुद्धा आरोग्यसेवेच्या बाबतीत गाफिल राहिलेले राज्य सरकार आता अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे असा आरोप आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे केला. कोरोना संदर्भात तहसील कार्यालयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज प्रशासकीय बैठक घेतली. बैठकी दरम्यान पैठण तालुक्यात रूग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा बाबत मंत्री दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे सांगून कोवीड नियंत्रणात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे असा आरोप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नसल्याने राज्य सरकार जबाबदारी पासून दूर पळत असून केंद्र सरकारवर आरोप करीत असल्याचे म्हटले आहे.
केंद्राने मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यास दिरंगाई
केंद्राने सर्व राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी १६३ प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी महिन्यात दिली आहे. यापैकी १० ऑक्सिजन प्लांट इंस्टॉलेशनची मंजुरी महाराष्ट्र राज्यास दिली होती. परंतु, राज्य सरकारने या दिशेने तातडीने पाऊले न उचलल्याने गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे दानवे म्हणाले.
ऑक्सिजन प्लांटची पाहणी......
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पैठण येथील कोवीड सेंटर व रूग्णालयात उभारण्यात येत असलेल्या प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची पाहणी करून दोन दिवसात प्लांट सुरू करा असे आदेश रूग्णालय प्रशासनास दिले. पैठण तालुक्यासाठी ५०० पीपीटी किट व ५००० सँनिटायझर बॉटल देण्याची घोषणा केली. पैठण साठी व्हेंटिलेटर उपलब्ध करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. यावेळी महिला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणनाना गायकवाड, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, अँड बद्रीनारायण भुमरे, कांतराव औटे, लक्ष्मण औटे, विजय चाटुपळे, सतिश आहेर, महेश जोशी, नम्रता पटेल, भाऊसाहेब बोरूडे, बंडू आंधळे आदी उपस्थित होते.