रांगोळी रेखाटनातील गणरायाचा ७०० कि.मी.चा विक्रमी प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:48 IST2017-08-06T00:48:37+5:302017-08-06T00:48:37+5:30
२०१५ साली रांगोळीने बाइंडिंगच्या खर्ड्या पुठ्ठ्यावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० कि.मी.चा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

रांगोळी रेखाटनातील गणरायाचा ७०० कि.मी.चा विक्रमी प्रवास!
ऋचिका पालोदकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : २०१५ साली रांगोळीने बाइंडिंगच्या खर्ड्या पुठ्ठ्यावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० कि.मी.चा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जान्हवी जयंत जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे हे गणपती डिंक किंवा तत्सम कोणत्याही पदार्थांनी पुठ्ठ्यावर चिकटवलेले नाहीत, हे जेव्हा बघणाºयांना कळते तेव्हा ते आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहत नाहीत.
जान्हवी जोशी यांना रांगोळी काढण्याचा छंद आहे. फेब्रुवारी २०१५ साली त्यांच्या मनात एक अचाट कल्पना आली आणि त्यांनी ७३ तासांत बाइंडिंगच्या जाड पुठ्ठ्यावर रांगोळीतून श्रीगणेशाची तब्बल १०८ वेगवेगळी रूपे साकारली. केवळ आवड म्हणून त्यांनी हे गणपती साकारले. त्यांच्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड आणि युनिक वर्ल्ड आॅफ रेकॉर्ड या संस्थांनी घेऊन त्यांना प्रमाणित केले. या विक्रमासाठी त्यांना पती जयंत जोशी यांची साथ मिळाली.
रांगोळीतून साकारलेल्या या कलाकृती त्यांनी घरात सांभाळून ठेवल्या, तसेच शहरात त्यांचे वेळोवेळी प्रदर्शनही भरविले. गणपतीच्या दिवसांत सहसा ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जीवाला’ अशा घोषणा दिल्या जातात. यातील ‘गणपती गेले गावाला’ हे वाक्य जयंत यांच्या मनात वेगळ्याच पद्धतीने चमकून गेले आणि त्यांनी हे गणपती त्यांच्या मूळ गावाला म्हणजेच नागपूरला नेण्याचे ठरविले. त्यांची ही कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटली; पण जोशी पती-पत्नींनी जणू बाप्पांना नागपूरला नेण्याचा चंगच बांधला होता. हे गणपती पुठ्ठ्यावर चिकटविलेले नसल्यामुळे त्यांना सहीसलामत नागपूरपर्यंत नेणे मोठे आव्हानात्मक होते, पण जोशी दाम्पत्याचा निश्चय पक्का होता. दोघांनी मिळून गणपती साकारलेले प्रत्येकी १० पुठ्ठे एकावर एक असे रचले आणि अशाप्रकारे एकूण ११ गठ्ठे तयार केले. त्यानंतर कागदाच्या आवरणात हे गठ्ठे व्यवस्थित गुंडाळले आणि दि. २१ सप्टेंबर रोजी नंदिग्राम रेल्वेने बाप्पांनी नागपूरकडे प्रस्थान केले.
डोळ्यात तेल घालून जोशी दाम्पत्यांनी जपलेल्या या कलाकृती नागपूरला सुखरूप पोहोचल्या. यातील काही कलाकृती थोड्याफार खराब झाल्या, पण जान्हवी यांनी त्यात चटकन सुधारणा केली. यानंतर नागपूर येथे रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. नागपूरकरांनी जान्हवी यांच्या या अफलातून क लेला मनापासून दाद दिली. बाप्पांच्या या थक्क करणाºया प्रवासाची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आणि काही दिवसांपूर्वीच जान्हवी व जयंत जोशी यांना नामांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.