रामनवमीसाठी रामभक्त सज्ज
By Admin | Updated: April 15, 2016 01:50 IST2016-04-15T01:30:23+5:302016-04-15T01:50:17+5:30
औरंगाबाद : श्रीरामनवमीनिमित्त उद्या शुक्रवार १५ एप्रिल रोजी शहरातील विविध राममंदिरांत दुपारी श्रीरामजन्माचे कीर्तन, आरती व सायंकाळी शोभायात्रा

रामनवमीसाठी रामभक्त सज्ज
औरंगाबाद : श्रीरामनवमीनिमित्त उद्या शुक्रवार १५ एप्रिल रोजी शहरातील विविध राममंदिरांत दुपारी श्रीरामजन्माचे कीर्तन, आरती व सायंकाळी शोभायात्रा, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता भाविकांना त्रास होऊ नये यासाठी विश्वस्तांनी मंदिराबाहेर मंडपही टाकले आहेत. शहरात श्रीरामनवमीचा सर्वात मोठा उत्सव किराडपुरा येथील श्रीरामचंद्र मंदिरात केला जातो. मंदिरात सकाळी १० वाजता सतीश भोसले यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता गांधेली येथील पोलीस पाटील श्रीहरी रसाळ यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात येणार आहे. यानंतर श्रीराम रथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा किराडपुऱ्यातून निघून सिडको एन-६ संभाजी कॉलनी, आविष्कार कॉलनी, बजरंग चौकमार्गे पुन्हा श्रीराम मंदिरात रथ आणण्यात येणार आहे.
कुंभारवाडा येथील अमृतेश्वर मंदिरात सकाळी श्रीरामनवमीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे दुपारी १२ वाजता विधिवत आरती करण्यात येणार आहे. समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात सकाळी १० वाजता श्रीराम रोडे महाराजांचे रामजन्माचे कीर्तन होणार आहे.
कैलासनगर परिसरातील श्रीराम देवस्थानाच्या वतीने दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बीड बायपास रोडवरील रामकृष्ण हरी मंदिर येथे सकाळी १० वाजता सद्गुरू विजयानंद महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
चेतक घोडा परिसरातील श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० वाजता हभप अनुराधा पिंगळीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. दुपारी १२.३० वाजता बासरीवादक बाबूराव दुधगावकर यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता स्वरसाधना ग्रुपतर्फे ‘गीतरामायण’ सादर करण्यात येणार आहे.
हडकोतील दीपनगर येथील राममंदिरात सकाळी ११.३० ते १२ वाजता श्रीरामजन्मकथा, आरती व रात्री ८ वाजता क्षमा नांदेडकर यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार
आहे.