मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- राजू शेट्टी
By Admin | Updated: August 7, 2014 23:37 IST2014-08-07T23:28:02+5:302014-08-07T23:37:13+5:30
जालना : शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली़

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- राजू शेट्टी
जालना : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती झालेली आहे़ निर्सगानेच शेतकऱ्यांवर ही वेळ आणली, त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी केली़
येथील मा़ फुलंब्रीकर नाट्यगृहात स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आयोजित जालना दुष्काळ मागणी परिषदेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत, युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, तुकाराम गवळी, जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमख भास्कर अंबेकर, रासपाचे मराठवाडा प्रमुख ओमप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती़
शेट्टी म्हणाले, राजकारण आमचा धंदा नाही. चळवळ म्हणून व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण करत आहोत. आज शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे़ शेतकऱ्यांनी उभी केलेली सहकार चळवळ आज शासन मोडीत काढण्यास निघाले आहे़ राज्यातील १५८ साखर कारखाने खाजगी झाले़ एकेकाळी एकही खाजगी कारखाना नव्हता़
शेतकऱ्यांसाठी असलेल्या कारखान्याला एकास नऊ प्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले़ ते फेडण्याची हमी राज्य सरकारने घेतलेले होती़ मात्र राज्यकर्तेच कारखान्याचे चेअरमन, संचालक झाले. त्यांनी कारखाना लुटला आणि लिलावात काढला़ तो घेणारे ही राज्यकर्तेच.
त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यात आम्ही सत्तेवर येताच लिलाव करून विक्री झालेले कारखान्याच्या मालमत्तेची बाजारभावाप्रमाणे तुलना करून त्यात तफावत आढळ्यास संबंधितावर कारवाई करून कारखाने ताब्यात घेवू़
जोपर्यंत आम्ही धोरणात्मक प्रश्नावर मत देत नाही, तोपर्यंत राज्यकर्ते घाबरणार नाही़ वर्षानुवर्ष त्यांची दुकानदारी, घराणेशाही सुरू आहेत़ ती संपविण्यासाठी सर्वांनी महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहन शेट्टी यांनी केले. (प्रतिनिधी)
महायुतीकडे ३८ जागा सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणार
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे ३८ जागेची मागणी केली असून १५ आॅगस्टपर्यंत त्यावर निर्णय होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़
जालन्यात गुरूवारी आयोजित दुष्काळ मागणी परिषदेसाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते़ शेट्टी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही शिवसेना- भाजप बरोबर युती केली. यात इतर सहा घटक पक्ष असल्याने ही महायुती झाली आणि लोकसभेत मोठे यश मिळविले़ त्याचप्रमाणे महायुती विधानसभेतही यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून शेट्टी म्हणाले, जागा वाटपाचा तिढाही सुटणार आहे़ आम्ही स्वाभिमानी पक्षाला ३८ जागा देण्याची मागणी महायुतीकडे केली़ त्यात मराठवाड्यात जालना, भोकर, जिंतूर, पाथरी, भूम परांडा या जागांचा समावेश आहे़ आम्ही जरी ३८ जागांची मागणी केली असली तरी एकूण ६३ जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे़ मागणी केलेल्या ३८ पैकी ८ जागा या प्रस्थापितांच्या आहेत़ ज्या ठिकाणी कधीच मित्रपक्षाला यश आले नाही़, अशा जागांवर आम्ही लढणार आहे़
लोकसभेत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी यांना पूर्वीच घोषित केले होते़ महायुती मुख्यमंत्रीपदाचा उमेंदवार जाहीर करणार का ? या प्रश्नावर शेट्टी म्हणाले, ज्या पक्षाचे जास्त सदस्य निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल़ अगोदरच उमेदवार जाहीर करावयाचा असल्यास इतर दोन पक्ष मोठे आहेत़ त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले़
...तर सगळीकडे हिरवेगार असते
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात राज्यकर्त्यांनी सिंचन घोटाळा केलेला आहे. हा घोटाळा झाला नसता, आणि इमानदारीने धरणे, बंधाऱ्याची कामे झाली असती तर आज सर्वत्र हिरवेगार, असे चित्र दिसले असते. पाणी अडवा पाणि जिरवा सारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या छायेत भरडला जात आहे. त्यातच शासनाचे शेतकऱ्यांविरोधी धोरण असल्याचा आरोप केला.