राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली. यावर सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथील बसस्थानका समोरील वार्ड क्रमांक १ मधील रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. अलिकडे राजूरात भीषण पाणी समस्या निर्माण झाल्याने खासगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. या भागात बहुतांशी नागरिक मजूरी करून उदरनिर्वाह भागवतात, त्यांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यातच ग्रामपंचायतच्या चुकीच्या नियोजनामुळे या भागात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. सध्या पावसाळा असूनही कडक ऊन आहे. भर उन्हात महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. त्रस्त महिलांनी आज अचानक ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतप्त महिलांनी गावाता पाणीपुरवठा होत असतांना आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतचे पदाधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला. यावेळी सरपंच शिवाजीराव पुंगळे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी विहीरीतून पाण्याचा दाब कमी झाल्याने पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही, आता येत्या दोन दिवसांत या वार्डात आपण जातीने लक्ष घालून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)भटकंती कायमदरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे गावातील आबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राजूरला महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा
By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST