पैठणमधून निवडणूक लढण्याचे राज ठाकरे यांना घातले साकडे !
By Admin | Updated: July 20, 2014 01:00 IST2014-07-20T00:41:50+5:302014-07-20T01:00:16+5:30
पैठण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक पैठण विधानसभा मतदारसंघातून लढवावी, असा प्रस्ताव मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी मांडला.

पैठणमधून निवडणूक लढण्याचे राज ठाकरे यांना घातले साकडे !
पैठण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक पैठण विधानसभा मतदारसंघातून लढवावी, असा प्रस्ताव मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी शनिवारी झालेल्या मनसेच्या आढावा बैठकीत वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला. या प्रस्तावाचे उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. बैठकीसाठी झालेली गर्दी व उत्साह पाहून मनसेचे वरिष्ठ नेते सुखावले.
मनसेचे विधानसभेतील गटनेते आ. बाळा नांदगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील माहेश्वरी भवनच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मनसेचे संपर्क नेते सतीश नारकर, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जि. प. बांधकाम सभापती डॉ. सुनील शिंदे, जि. प. सदस्या शीला विजय चव्हाण, पं. स. सदस्य विठ्ठल मोगल, कृष्णा गिधाने, पुष्पा रामनाथ केदारे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब सोलाट, शहराध्यक्ष संतोष जोशी, राजेंद्र तांबे, शिवाजी नरके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नारकर यांनी केले.
पैठण तालुक्यात मनसेची ताकद मोठी
मनसेची ताकद पैठण तालुक्यात आहे. दोन वेळेस विधानसभेच्या निवडणुकीत ही ताकद दिसून आली आहे. यंदा जोरदार प्रयत्नाने मनसेचा झेंडा तालुक्यात विधानसभेला फडकू शकतो. यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साह टिकवून ठेवावा, असे आवाहन अविनाश अभ्यंकर यांनी केले.
यादीत पैठण ए प्लस मतदारसंघ
पैठण विधानसभा मतदारसंघ मनसेच्या यादीत ‘ए प्लस’ असून या मतदारसंघास मनसे त्याच पद्धतीने ताकद देईल, असे आश्वासन बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिले. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांत दौरा केला; परंतु असा उत्साह कोठे दिसून आला नाही, असेही ते म्हणाले.