‘कृषी संजीवनी’ला जिल्ह्यात मिळेना उभारी
By Admin | Updated: March 16, 2015 00:52 IST2015-03-16T00:29:01+5:302015-03-16T00:52:55+5:30
बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत

‘कृषी संजीवनी’ला जिल्ह्यात मिळेना उभारी
बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती व बिले अदा करायची मानसिकताच नसल्यामुळे या योजनेचा कालावधी वाढविला तरीही संजीवनीच मिळाली नाही.
आॅगस्ट २०१४ ला योजनेचा प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात येथील मंडळातून योजनेला उभारी देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ग्राहकांना योजनेची माहिती होण्यासाठी वीज बिलासोबत योजनेची माहिती पुस्तिका देण्यात आली तसे स्थनिक पातळीवर अभियंत्यांनी योजनेची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिली. मात्र काळाच्या ओघात योजनेला मरगळ आली.
१ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर या योजनेच्या कालावधीत लातूर, बीड, उस्मानाबाद परिमंडळात ४६ हजार धारकांनी लाभ घेतला होता तर बीड मंडळातून फक्त १४,७२६ ग्राहकांनी लाभ घेतला. योजनेला समाधानकारक ग्राहकसंख्या न मिळाल्याने योजनेत तब्बल ५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीमध्ये महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारी पोहचिवणे अपेक्षित होते. उलटार्थी या चार महिन्याच्या कालावधीत बीड मंडळातून फक्त ७७५ ग्राहकांची भर पडली आहे. मुदतवाढीचा फायदा तर सोडाच मात्र यंत्रणेवर महावितरणचा अधिक खर्च झाला आहे.
योजनेचा उरला पंधरवाडा
तब्बल पाच महिन्यांची मुदतवाढ करून देखील ग्राहकांची संख्या वाढली नाही. ३१ मार्चला योजनेचा शेवट होणार आहे. त्यामुळे शेतीपंप धारकांकडून योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)