शेतकऱ्यांनी पाडला तक्रारींचा पाऊस
By Admin | Updated: August 3, 2014 01:15 IST2014-08-03T00:45:05+5:302014-08-03T01:15:30+5:30
उमरगा : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला.
शेतकऱ्यांनी पाडला तक्रारींचा पाऊस
उमरगा : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. संपादीत केलेल्या जमिनीच्या नोंदीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या चुका. संपादीत जमिनीचे मोजमाप इत्यादी तक्रारींचे निरसन करण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात शनिवारी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद येथील भू-संपादन मांजरा प्रकल्पाचे अधीक्षक आर.के. जोशी, सोलापूर येथील एन.एच.आयचे प्रबंधक आर.एम. जिरंगे, भूमी अभिलेख कार्यालयाचे ए.एच. पाटील, तालुका कृषी अधिकारी हणमंतराव गोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एस. व्हनाळे, पीबीएचे प्रबंधक प्रमोद चंडके, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, नगरसेवक बालाजी सुरवसे, आकाश शिंदे आदींसह उमरगा, लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.शेतकऱ्यांच्या संपादीत जमिनीची कायदेशीरपणे संयुक्त मोजणी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात यावे, जमिनीचे मुल्यांकन शेतकऱ्यांसमोरच करण्यात यावे, मुल्यांकन बाजारभाव खरेदी खतानुसार करण्यात यावे, मावेजाची रक्कम तक्रारींचे निरसन करुनच करण्यात यावी. मावेजाचे वाटप ग्रामपंचायत ८ अ व सातबारा प्रमाणे काढण्यात यावा. उमरगा शहराकरिता किमान ५८० रुपये प्रति स्क्वेअर फुटाप्रमाणे मावेजाची रक्कम मंजूर करावी, कराळी, दाळींब, येणेगूर येथील शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून दुबार मोजणी करण्यात यावी आदीस मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. (वार्ताहर)
पाच तास मॅरेथॉन बैठक
सलग पाच तास चालू असलेल्या या बैठकीत संपादीत जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा, यासह आदी तक्रारींचा पाऊस शेतकऱ्यांनी पाडला. तक्रारींचे निरसन करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. यावेळी आ. चौगुले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या संपादीत जमिनीचे योग्य मुल्यमापन करुन योग्य मावेजा देण्याचे निर्देश दिले.