छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. दिवाळीच्या सणासुदीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, फर्दापूर आणि सोयगावला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरींनी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा तारांबळ उडवली.
या पावसामुळे मका, कापूस, सोयाबीन, बाजरी यांसारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात सोंगणी केलेला मका पूर्णपणे भिजला असून, कापसाच्या वाती जमिनीवर पडल्या आहेत. काही ठिकाणी तर शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन व मक्याच्या ढिगाऱ्यांत बुरशी लागण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अनेकांनी दिवाळीपूर्वी पिकांची कापणी करून उत्पन्नाची वाट पाहत असतानाच निसर्गाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. गेल्या महिन्यातील अतिवृष्टीचे अनुदान अद्याप न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले होते. त्यात आता अवकाळी पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. शेतकरी वर्गातून सरकारने तातडीने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पावसामुळे रब्बी हंगामाच्या मशागतीलाही मोठा फटका बसला आहे.
चापानेर परिसरात पावसाची जोरदार हजेरीचापानेर: कन्नड तालुक्यातील चापानेर परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोंगून ठेवलेला मका झाकताना शेतकऱ्यांची धांदल उडाली असून, वेचणीस आलेल्या कपाशी पिकालाही फटका बसण्याची शक्यता आहे. अवेळी पावसामुळे रब्बी पिकासाठी मशागत करणेही आव्हानात्मक ठरत आहे.
परसोडा परिसरात तिसन्या दिवशीही दमदार पाऊसपरसोडा : परिसरात तीन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतांमध्ये पाणी साचले असून मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापसाच्या वाती जमिनीवर लोळत आहेत, तर मक्याची कणसे भिजली आहेत. परसोडा, भिवगाव, बेंदवाडी, शिवराई, सवंदगाव, जमनवाडी, विनायकनगर या भागात तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरवले आहे. काही ठिकाणी तर शेतीत पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
धानोरा, वांगी, सिसारखेडा, उपळी परिसरात कपाशीचे नुकसानभराडी : सिल्लोड तालुक्यातील धानोरा, वांगी बु., सिसारखेडा व उपळी परिसरात भाऊबीजेच्या दिवशी, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आलेल्या या अनपेक्षित पावसामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे.उपळी परिसरात आठ दिवसांपासून २ अधूनमधून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले आहे. सततच्या ओलाव्यामुळे मका चारा सडत असून पशुधनासाठी चाऱ्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाऊबीजच्या सणासुदीच्या काळात झालेल्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यात सर्वदूर...सिल्लोड : तालुक्यातील सर्व आठ मंडळांत शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बोरगाव मंडळात सर्वाधिक पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप मका व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोंगून ठेवलेली मका पाण्यात भिजली तर फुटलेला कापूस ओला झाला. दिवाळी आणि भाऊबिजेच्या पार्श्वभूमीवर उरलेली आशाही शेतकऱ्यांसाठी राखरांगोळी ठरली. कायगाव येथे बुधवारी (दि.२२) संध्याकाळी पाच ते रात्री नऊ-दहा दरम्यान झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल वाढवली. निवृत्त सैनिक संजय तोताराम साळवे यांनी दोन हेक्टर मका पीक काढणी करून ताडपत्रीवर वाळवत ठेवले होते; मात्र पावसात तब्बल २५ क्विंटल मका भिजून नुकसान झाले. सध्या मका काढणीस मजूर मिळणेही कठीण आहे.
सोयगावात अर्धा तास मुसळधारसोयगाव : सोयगावसह परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात व परिसरातील जरंडी, निंबायती, माळेगाव, पिंपरी, घोसला, नांदगाव तांडा आदी भागात सुमारे अर्धातास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हलक्या सरी झाल्या. दरम्यान, दिवाळीनंतर राहिलेल्या कापूस वेचणीच्या कामाने वेग घेतला होता. परंतु, पावसामुळे वेचलेल्या कापसासह शेतातील झाडावरील कापसाच्या वाती झाल्या. मक्याची कणसे शेतातच असल्याने भिजून त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
फर्दापूरमध्ये पावसाचा फटकाफर्दापूर : येथे शुक्रवारी साडेपाच वाजता विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे कापूस व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कापूस सात हजार रुपये क्विंटल भावात होता. पण, पावसामुळे व्यापारी कमी भाव मागणी करतील, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
गंगापूरमध्ये पावसामुळे नुकसानगंगापूर: तालुक्यात मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. लासूर, वाळूज व गंगापूर परिसरात तासभर मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे नुकसान झाले. आधीच्या अतिवृष्टीची भरपाई न मिळताच पुन्हा पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत.
अंभई येथे तासभर पाऊस, बाजारात धावपळअंभई: शुक्रवारी दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत अंभई परिसरात अचानक मध्यम स्वरूपाचा आणि मेघगर्जनेसह पाऊस आला. शेतकऱ्यांना मका व सोयाबीन वाळवण्यासाठी धावाधाव करावी लागली, तर बाजारातील व्यापाऱ्यांनी भाजीपाला, कापड व किराणा माल झाकून ठेवला. पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले. बाजारातील ग्राहकांची धावाधाव झाली.
परिसरात केळगावसह पावसाने वाढविली चिंताकेळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आमठाणा, धावडा, केळगाव आणि पेडगाव परिसरात बुधवारी दुपारी सुमारास तीन वाजेदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे सोंगणी करून ठेवलेला मका व सोयाबीनसह जनावरांचा चारा भिजून खराब झाला. बुधवारी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील मका, सोयाबीन व कापूस या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. कापूस वेचणी व मका-सोयाबीन सोंगणीसाठी दिवाळी सणामुळे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले. मजूर टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतात झाडांवर असून, आता या पावसाने त्या पिकाचेही नुकसान झाले आहे.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar farmers are reeling from unseasonal rains, damaging harvested crops like maize, cotton, and soybean. Already struggling from previous losses, farmers urgently need government assistance as the unseasonal rains have made the situation worse and impacted rabi season preparations.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर के किसान बेमौसम बारिश से परेशान हैं, जिससे मक्का, कपास और सोयाबीन जैसी काटी गई फसलों को नुकसान हुआ है। पहले से ही नुकसान से जूझ रहे किसानों को तत्काल सरकारी सहायता की आवश्यकता है क्योंकि बेमौसम बारिश ने स्थिति को और खराब कर दिया है और रबी सीजन की तैयारियों पर असर पड़ा है।