पावसाचा अहवाल कुलाबा वेधशाळेकडे
By Admin | Updated: July 24, 2016 00:46 IST2016-07-24T00:39:07+5:302016-07-24T00:46:45+5:30
लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पावसाचा अहवाल कुलाबा वेधशाळेकडे
लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ढग भरून येत आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला असल्याने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने लातूर जिल्ह्यातील पावसाचा आढावा कुलाबा वेधशाळेकडे पाठविला आहे. गेल्या १० वर्षांची पावसाची परिस्थिती यात मांडण्यात आली असून, आॅगस्ट महिन्यात लातूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यात मांजरा धरण आहे. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून कोरडेठाक आहे़ लातूर शहरासाठी रेल्वेने मिरजहून तसेच निम्न तेरणाहून टँकरव्दारे पाऊस सुरू आहे़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत चालू वर्षातील मोठे, मध्यम व लघुप्रकल्प अशा एकूण १४२ प्रकल्पामध्येही पाणी आलेले नाही़
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी साठवणूक क्षमता ६९५़१८५ एमएमक्यूब इतकी आहे़ तर दोन मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा कोरडे आहे व निम्न तेरणामध्ये १़ ६१९ दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे भविष्यातील टंचाईचे वेध लातूरकरांना लागले आहेत.
जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्प बीड-उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांतर्गत १० मंडळे येतात. या कॅचमेंट भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तर ज्या भागात झाला तो भाग कँचमेंट भागात येत नसल्याने त्या पावसाचा लातूर जिल्ह्यासाठी उपयोग होत नाही़ मांजरा, निम्न तेरणा, व्हटी, घरणी या प्रकल्पातील पाणीसाठी कमी होता. त्यातच पर्जन्यमानही झाले नसल्याने अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले़
लातूर जिल्ह्यात गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी पाऊस कमी-कमी होत गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. भर पावसाळ्यात लातूर शहरासह ग्रामीण भागांतही टंचाईच्या झळा कायम आहेत. ढग भरून येत असले, तरी ते पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
४गतवर्षी लातूर जिल्ह्यात सहा वेळा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रयोग राबविल्यास नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे लातुरात विमानतळ, गोडावून व कृत्रिम पावसासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.