पावसाने वीज पुरवठा बंद
By Admin | Updated: June 22, 2014 00:24 IST2014-06-22T00:14:48+5:302014-06-22T00:24:04+5:30
पालम : तालुक्यात पाऊस पडताच विद्युत पुरवठा बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अर्धा तालुका अंधारात आहे. त्यामुळे तालुकावासियांची गैरसोय होत आहे.
पावसाने वीज पुरवठा बंद
पालम : तालुक्यात पाऊस पडताच विद्युत पुरवठा बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अर्धा तालुका अंधारात आहे. त्यामुळे तालुकावासियांची गैरसोय होत आहे.
पालम येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे. आतापर्यंत तांत्रिक बिघाडाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांवर पाऊस पडताच अंधारात राहण्याची वेळ येत आहे.
ग्रामीण भागात विद्युतपुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे जाळे आहे. परंतु विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य तारा अतिशय जुन्या झाल्याने पाऊस व वारा सुरू होताच वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-मोठ्या बिघाडाकडे लाईनमन लक्ष देत नाहीत, त्यामुळे रात्र-रात्र अंधारात राहण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे.
चोरवड परिसरात तर मागील महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे. या भागातील लाईनमन महिना-महिना फिरकत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
साहित्य जुनाट झाल्याने वीज कंपनीचा कारभार रामभरोसे बनलेला आहे. या विजेच्या लपंडावात वाढ होताना दिसत आहे. विजेचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चोरवडचे सरपंच बाळासाहेब देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
वीज पुरवठा टिकेना
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका घरगुती ग्राहक, व्यवसायिक व कृषीपंपधारकांना बसत आहे. भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा सुरळीत होत नाही. विद्युत पुरवठ्यात नेहमीच बिघाड होत असल्याने सुरळीत पुरवठा होणे कठीण झाले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.
लाईमन फिरकेना...
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने कळस गाठला आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळी तक्रार करीत आहेत. परंतु या तक्रारीची दखल घेण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. लाईनमनवर अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याने ग्रामीण भागाकडे लाईनमन फिरकत नाही.