पावसाने डोळे वटारले
By Admin | Updated: June 26, 2014 00:39 IST2014-06-26T00:15:11+5:302014-06-26T00:39:35+5:30
नांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. याशिवाय पाणीटंचाईही निर्माण होईल, अशी शक्यता आहे.
पावसाने डोळे वटारले
नांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. याशिवाय पाणीटंचाईही निर्माण होईल, अशी शक्यता आहे.
हिमायतनगर : तालुक्यात तुरळक पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला़ सरासरी २० हजार हेक्टर कापसाच्या क्षेत्रापैकी १० हजार हेक्टर कापसाची पेरणी झाली आणि सोयाबीनच्या ७ हजार ५०० हेक्टरपैकी २० टक्के म्हणजे १५० ० हेक्टर पेरणी झाली़ शेतकऱ्यांचे ३ कोटी ९८ लाखांचे बियाणे पेरणीनंतर पाऊस न पडल्याने वाया गेल्यात जमा आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ तालुक्यात एकूण क्षेत्र ३३ हजार ४०० असून पैकी कापसाचे क्षेत्र मागील वर्षी २० हजार ६०० होते़ या खरीप हंगामात ते घटून २० हजार हेक्टर होणार असून पैकी ५० टक्के पेरणीमुळे १० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणामुळे धूळपेरणी केली़
एका हेक्टरला ३ बॅगाप्रमाणे तीन बॅगचे २८०० रुपये गुणिले १० हजार हे़ प्रमाणे २ कोटी ८० लाखाचे कपाशीचे बियाणे मातीमोल होवून बुडले़ तर सोयाबीन मागील वर्षी ६ हजार ९६३ होते़ ते वाढून ७ हजार ५०० हेक्टर होणार आहे़ त्यापैकी २५ टक्के पेरणी झाली आहे़ १ हजार ७५० हेक्टर सोयाबीन पेरणी पूर्ण झाली़ प्रतिबॅग २७०० प्रमाणे प्रतिहेक्टर अडीच बॅगचे १ कोटी १८ लाख १२ हजार ५०० रुपये असे कापूस व सोयाबीन मिळून ३ कोटी ९८ लाख १२ हजार ५०० बियाणे पावसाअभावी गेले असून दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़
शेतकऱ्यांनी महागामोलाचे कापूस, सोयाबीन, बियाणे बँकेचे कर्ज व खाजगी सावकारी कर्ज काढून मोठ्या मुश्किलीने पेरणी केली़ दुबार पेरणीसाठी पैसा नाही़ जनावरांना चारा नाही़
पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे़ मुलांचे शिक्षण, दैनिक खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ शेतकऱ्यांकडे हवामान आधारित पीक विम्याकडे पैसे नाहीत़ आकाशात ढग येतात व जातात़शेतकरी निराश होत आहेत़ त्यांना दुबार पेरणीसाठी मदतीची आवश्यकता आहे़ तरी बरेच राहिलेले शेतकरी पाणी पुरेल या आशेवर धूळ लागवड करीत आहेत़
बोधडी : बोधडी परिसरात १७ ते १८ जून रोजी परिसरात मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने १८ व १९ रोजी कापसाची जवळपास १०० टक्के लागवड केली़ त्यानंतर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ परंतु कापूस लागवड झाल्यापासून अद्याप पावसाने दडी मारल्याने बियाणे जमिनीत खराब होवून वाया जाण्याची शक्यता असल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे़ या भागातील बँक पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असून जुने थकित कर्ज भरल्याशिवाय नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करीतआहेत़
निवघा बाजार : तापमानात वरचेवर वाढ होत असल्याने पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे़ रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र अन् आता आर्द्रा नक्षत्र लागून तीन दिवस लोटले तरी पावसाचा पत्ता नाही़ यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे़ पावसाळा लागला, यामुळे थोडा मोठा पाऊस पडेल अन् मृग नक्षत्रात कपाशीची लागवड व पेरणी केल्यास उत्पन्न झाले मिळते, म्हणून निवघा बाजार परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी धाडस करून धुळपेरणी केली़ तर काहींनी विहिरी व बोअरच्या भरवशावर कपाशीची लागवड केली़ काहींचे बियाणे उगवले तर काहींचे जमिनीतच करपले. काही जण पीक वाचविण्यासाठी ओंजळीने पाणी टाकत आहेत़ यामुळे धाडस करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावणार असे दिसते़
मांजरम : या परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. आर्द्रा नक्षत्रात पाऊस पडला तर पेरणी होईल, या आशेवर शेतकरी आहेत.
अर्धापूर तालुक्यात केवळ ४ मि.मी पाऊस
अर्धापूर : तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असताना पीक विमा योजनेची अंतिम तारीख जवळ आल्याने विमा योजनेत सहभागी व्हावे का नाही याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत पडले आहेत़ खरीप हंगाम २०१४ मध्ये पीक पेरल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधी अपुरा पाऊस, पावसात पडणारा खंड, अतिपाऊस यापासून नुकसान झाल्यास हवामानावर आता पीक विमा योजनेच्या तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना विमा संरक्षण देवून आर्थिक स्थैर्य देण्यात येते़ तालुक्यात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग पिकासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईमार्फत विमा योजना कार्यान्वित होणार आहे़ या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० जून आहे़ तालुक्यात आजपर्यंत ४ मि़मी़ पाऊस झाल्यामुळे पेरणीयोग्य पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ ७ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास खरीपात सर्व पिके घेता येतील़ पण ७ जुलैनंतर जर पाऊस झाला तर उडीद व मूग ही पिके घेता येणार नाहीत़ आभाळाकडे टक लावून बघत बसलेला शेतकरी पाऊस न झाल्याने विमा योजनेत सहभागी व्हावे का नाही अशा द्विधा मनस्थितीत आहे़
३० जूनपर्यंत पाऊस पडल्याने खरिपाची पेरणी झाली तरी उत्पन्नात फरक पडणार नाही - गार्गी स्वामी, कृषी अधिकारी, पंचायत समिती़
कर्जदार शेतकऱ्यांनी पीक नियोजनामध्ये काही बदल झाल्यास पेरणीनंतर एक आठवड्याच्या आत संबंधित बँकेस कळवावे - बी़पी़ पाटील, मंडळ कृषी अधिकारी, अर्धापूर