पाच तालुक्यांत पावसाची हजेरी
By Admin | Updated: August 12, 2015 00:58 IST2015-08-12T00:49:04+5:302015-08-12T00:58:13+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, उमरगा व लोहारा परिसरात

पाच तालुक्यांत पावसाची हजेरी
उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, उमरगा व लोहारा परिसरात अर्धा ते पाऊण तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ तर सोमवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात सरासरी ५़३७ मिमी पाऊस झाला असून, सर्वाधिक तुळजापूर तालुक्यात १७़२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ अडीच महिन्यापासून गायब असलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला असून, टंचाई निवारणासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़
तुळजापूर शहरासह काक्रंबा, नळदुर्ग, अणदूर, जळकोट आदी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ या पावसाची नोंद १७़२९ मिमी झाली आहे़ तर त्यापोठोपाठ उमरगा तालुक्यात १० मिमी, उस्मानाबाद तालुक्यात ८़६३ मिमी पाऊस झाला़ तर मंगळवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह येडशी, सारोळा बुद्रुक, उपळा, बेंबळी, रूईभर आदी परिसरात पावसाने जवळपास पाऊण तास हजेरी लावली़ भूम शहरासह गोलेगाव, आष्टा, सावरगाव, चिंचोली, पाथरूड, आंबी परिसरातही पावसाने काही काळ हजेरी लावली़ तुळजापूर शहरासह नळदुर्ग, काक्रंबा परिसरात रात्री उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता़ लोहारा शहरासह परिसरात साधारणत: अर्धा तास पावसाने हजेरी लावली़ उमरगा शहरासह परिसरातील अनेक गावात एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ तसेच परंडा शहरासह तालुक्यातील भोत्रा, करंजा, पिठापुरी, जामगाव, कासीमबाग, खानापूर, खासापुरी, रूई, सोनगिरी, कात्राबाद परिसरात हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ कळंब तालुक्यातील येरमाळा व परिसरातही पाऊण तास पावसाने हजेरी लावली़ दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावण्या सुरूवात केली आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़ तर पाणी, चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.