लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पंधरवड्यानंतर पावसाने मराठवाड्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून नदी, नाले फुगले आहेत.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी हलकासा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात रविवारी रात्रभर भीज पाऊस झाला. गेल्या २४ तासांत सरासरी २५ मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, उमरगा, कळंब या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यात सरासरी २०.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे दमदार पाऊस झाला. लातूर शहर व जिल्ह्यातही सोमवारी हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत रविवारी रात्री अतिवृष्टी झाली. सोमवारी सायंकाळी जालना शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्त टळले आहे.
पालघरमध्ये वीज पडून मुलाचा मृत्यू n डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने झाडावर चढून मोबाईल पाहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा झाडावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. तर यात तीन मुले जखमी झाली असून, यातील एकाची स्थिती गंभीर आहे. n उंबराच्या झाडावर वीज पडल्याने रविन कोरडा (१६) याचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत.