पावसाचा दिलासा

By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:54:24+5:302014-08-23T00:45:36+5:30

परभणी: दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

Rain consolation | पावसाचा दिलासा

पावसाचा दिलासा

परभणी: दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी १६ मि.मी. पाऊस झाला असला तरी माना टाकणाऱ्या पिकांसाठी हा पाऊस ‘आॅक्सीजन’ ठरला आहे.
यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती अतिशय नाजूक झाली होती. सरासरीच्या १३ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाळ्याच्या दिवसांतही कडक ऊन, वाढलेला उकाडा आणि पाण्यासाठी भटकंती असे उन्हाळ्यातील चित्र नागरिक अनुभवत आहेत. पिकांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबिन ही मुख्य पिके असून, दीड महिन्यांपासून पाऊसच नसल्याने पिके माना टाकू लागली होती. चार-आठ दिवस पाऊस झाला नाही तर ही पिके भुईसपाट होण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले होते. या संकटकाळातच गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे वरुणराजा मदतीला धाऊन आला. २२ आॅगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असला तरी सेलू आणि जिंतूर या तालुक्याची मात्र निराशा केली आहे. परभणी तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस झाला. सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझीम पाऊस सुरू होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रथमच येथील नागरिकांनी पावसाळी वातावरण अनुभवले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १६ मि.मी. पाऊस
२२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.८१ मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यात ०.४० तर जिंतूर तालुक्यात फक्त १ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ५२ मि.मी. पाऊस सोनपेठ तालुक्यात झाला असून, त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यात ३७.७५, परभणी तालुक्यात १५.३८, पालम १०, पाथरी ९, पूर्णा ८.४० आणि मानवत तालुक्यात ८.३३ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १५३.४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २११ मि.मी. पाऊस झाला. गतवर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात ६१० मि.मी. पाऊस झाला होता, हे विशेष.
मराठवाड्याची स्थिती
आजपर्यंत होणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ ३५.२९ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २९.३ टक्के, जालना जिल्ह्यात ३६.१४ टक्के, परभणी जिल्ह्यात ३६.५८ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ४३.०६ टक्के, नांदेड जिल्ह्यात ३९.७८ टक्के, बीड जिल्ह्यात ३२.५३ टक्के, लातूर जिल्ह्यात ३६.४३ टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात २३.७१ टक्के पाऊस झाला आहे.
पिकांना जीवदान
शुक्रवारी जिल्ह्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तब्बल दीड महिन्याच्या खंडानंतर हा पाऊस झाला. अल्प पावसावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. कापूस, सोयाबिन ही पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात होती. जमिनीतील पाणी पातळी कमी होत असल्याने दोन्ही पिके धोक्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे.

Web Title: Rain consolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.