राष्टÑवादीला मुंडेंचा दे-धक्का

By Admin | Updated: May 18, 2014 00:46 IST2014-05-18T00:35:55+5:302014-05-18T00:46:22+5:30

प्रताप नलावडे , बीड राष्टÑवादी काँग्रेसने गोपीनाथ मुंडे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करूनही बीड लोकसभा मतदारसंघातील मतदार त्यांच्यासोबतच राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Radhika Mundane's shock | राष्टÑवादीला मुंडेंचा दे-धक्का

राष्टÑवादीला मुंडेंचा दे-धक्का

 प्रताप नलावडे , बीड राष्टÑवादी काँग्रेसने आपली सर्व शक्ती पणाला लावत आणि गोपीनाथ मुंडे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करूनही बीड लोकसभा मतदारसंघातील मतदार त्यांच्यासोबतच राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या भावनिक हाकेला प्रतिसाद देत मतदारांनी सव्वा लाखापेक्षाही अधिक मतांची आघाडी देत विजयी केले. शरद पवार आणि मुंडे यांच्यातील हा सामना मुंडे यांनी एकहाती जिंकत बारामतीकरांचे मनसुबे उधळून लावले. गुरू आणि शिष्यातील ही लढाई गुरूने लिलया जिंकली. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संपूर्ण राज्यभर औत्सुक्याचा विषय ठरली होती. भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचाच आणि त्यांना बीडमध्येच रोखून ठेवायचे यासाठी राष्टÑवादी काँग्रेसने आखलेली रणनिती मुंडे यांना विजयापासून रोखू शकले नाहीत. बीड जिल्हा हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला. सहा विधानसभा मतदारसंघात परळी वगळता सर्व आमदार राष्टÑवादीचे आहेत. याशिवाय दोन विधानपरिषद सदस्यही राष्टÑवादीचेच. पालकमंत्रीही राष्टÑवादीचेच. असे असतानाही मुंडे यांनी मिळविलेला दणदणीत विजय म्हणजे जोरदार दिलेला धक्काच म्हटला जात आहे. मुंडे यांनी या निवडणुकीत केलेले बेरजेचे राजकारणही त्यांच्या पथ्यावर पडले. राष्टÑवादीचे अनेक नेत्यांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन आपली राजकीय मुसद्देगिरी दाखवून दिली. मराठा आरक्षणाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या समाजाची मतेही आपल्याकडे वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. जातीय समिकरणांचा परिणाम जातीय समिकरणाचा विचार करता, मराठा, वंजारा आणि मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात वंजारा समाज तर मुंडे यांच्यासोबतच राहिला असल्याचे स्पष्ट झाले. परंतु याशिवाय मराठा समाजही आरक्षणाच्या मुद्यावर मुंडे यांच्यासोबत राहिला. मुस्लीम मतदार त्यांच्या सोबत राहणार की नाही, अशी शंका सुरूवातीला व्यक्त केली जात होती. मुंडे यांनी हा अंदाजही फोल ठरवित मुस्लीम मतदारांना आपलेसे केले. ओबीसी समाजाचे नेते म्हणूनच त्यांची ओळख असल्याने ओबीसी समाजही या निवडणुकीत यांच्यासोबतच राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्टÑवादीचे सुरेश धस हे मराठा समाजाचे उमेदवार असूनही त्यांना मराठा समाज आपलासा करता आला नाही नेत्यांनी बजावलेली भूमिका गोपीनाथ मुंडे यांच्या विजयासाठी त्यांची कन्या आमदार पंकजा पालवे यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. याशिवाय शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंडे यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी मराठा समाजाला मुंडे यांच्या बाजुने वळविण्यासाठी प्रयत्न केले. धस यांच्या आष्टी मतदारसंघात बाबुराव पोटभरे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मुंडे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी शिवसैनिकांची नाराजी दूर करुन त्यांना प्रचारात सक्रिय केले. रिपाईच्या पप्पू कागदे यांनी नेहमी भाजपाच्या विरोधात असणारी दलित मते मुंडे यांच्या बाजुने वळविण्याची महत्त्वाची कामगिरी केली. मुंडेंच्या मंत्रीपदाची जिल्हावासीयांना उत्सुकता भाजपाचे नवनिर्वाचित खासदार गोपीनाथ मुंडे यांचा नरेंद्र मोदी यांच्या नेृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे. भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी परळी येथील जाहीर सभेत गोपीनाथ मुंडे जिंकले तर त्यांना मोदी सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून संधी मिळेल असे सुतोवाच केले होते. मुंडेंनी सलग दुसर्‍यांदा दिल्लीत धडक मारली आहे. भाजपाचे महाराष्ट्राचे नेते म्हणून मुंडेंकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात वजनदार खाते मिळण्याचे संकेत आहेत. दरम्यान, मुंडे यांना कुठले मंत्रीपद मिळते याची आता जिल्हावासियांना उत्कंठा लागली आहे. यापूर्वी बबनराव ढाकणे व जयसिंग गायकवाड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले होते. कॅबिनेट म्हणून आजपर्यंत बीडला संधी मिळालेली नव्हती. मुंडेंच्या रुपाने बीडच्या मातीत घडलेले व वाढलेले नेतृत्व दिल्लीत राज्य करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची सर्वांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादी चिंतेत! भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना अडचणीत आणू पाहणार्‍या राष्ट्रवादी कॉग्रेसवरच मुंडे यांनी डाव उलटवून लावला. मुंडेंच्या विजयाने राष्ट्रवादीला व विशेषत: शरद पवार यांना जोरदार हादरा बसला आहे. मुंडेंचा अटकाव करण्यासाठी शरद पवार ऐन निवडणुकीत बीडमुक्कामी होते; पण मोदीलाट ,सरकारविरोधी रोष, मुंडेंची लोकप्रियता सुरेश धस यांना अडचणीची ठरली.

Web Title: Radhika Mundane's shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.