रवींद्रनाथ टागोर शाळेला अखेर कुलूप लागणार
By Admin | Updated: June 13, 2014 01:11 IST2014-06-13T01:03:39+5:302014-06-13T01:11:42+5:30
औरंगाबाद : उपसंचालकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत व्यंकटेश शिक्षणसंस्थेच्या कार्यकारी मंडळाने रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रवींद्रनाथ टागोर शाळेला अखेर कुलूप लागणार
औरंगाबाद : टप्प्याटप्प्याने वर्ग बंद करण्याचा शिक्षण उपसंचालकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत व्यंकटेश शिक्षणसंस्थेच्या कार्यकारी मंडळाने रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यकारी मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पुरेशा वर्ग खोल्या, भौतिक सुविधा व आरटीई-२००९ मुळे शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे. या निर्णयास शाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. खंडपीठाने दिलेल्या निकालात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाबाबत निर्णय दिला असून, माध्यमिक शाळा सुरू ठेवण्याबाबत कुठलाच निर्णय दिला नाही. त्यामुळे कार्यकारी मंडळाने यापूर्वीच शाळा बंद करण्याबाबत व विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना कळविले आहे.
चौकशी समितीची शिफारसही लाथाळली
रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा एकदाच बंद करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा व विद्यार्थी हिताच्या विरुद्ध आहे. शाळेची विद्यार्थिसंख्या मोठी असून, नजीकच्या शाळांतून या विद्यार्थ्यांचे समायोजन करणे अवघड आहे, अशी शिफारस माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. क्रीडांगणाचा मुद्दा उपस्थित करून व्यवस्थापनाने माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांना तशा नोटिसा बजावल्या होत्या.
सदर संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक, असे दोन्ही विभाग एकाच इमारतीत चालविले जातात; परंतु जागेचा मुद्दा पुढे करून फक्त माध्यमिक विभाग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. आठवी ते दहावी या तीन वर्गांसाठी संस्थेला सहा तुकड्या मंजूर असून, सहशिक्षकांचे ९ व शिक्षकेतर ५ पदे मंजूर आहेत. या तीन वर्गांत ३५१ विद्यार्थी शिकत आहेत.
शाळेचा दहावीचा निकालही चांगला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, पालकांचा विरोध व शिक्षकांच्या सेवासमाप्तीबाबतचे न्यायालयात प्रलंबित प्रकरण, विद्यार्थी समायोजनाची अडचण, जवळच्या शाळेत असलेली विद्यार्थ्यांची जास्त संख्या या बाबींचा विचार करता कोणत्याही विद्यार्थ्यास टीसी देऊ नये, असे मत चौकशी समितीने नोंदविले आहे.
व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरुद्ध पालकांमध्ये तीव्र संताप आहे. १५० हून अधिक पालकांनी लेखी तक्रारी देऊन शाळा बंद करण्यास विरोध दर्शविला आहे. मनविसेने याविरुद्ध आंदोलन छेडले होते.