रुग्णांचा सवाल, डाॅक्टर कोरोना नसताना म्युकरमायकोसिस का झाला?
By संतोष हिरेमठ | Updated: August 26, 2022 13:32 IST2022-08-26T13:31:31+5:302022-08-26T13:32:12+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘म्युकरमायकोसिस’ने राज्यभरात एकच हाहाकार उडाला होता.

रुग्णांचा सवाल, डाॅक्टर कोरोना नसताना म्युकरमायकोसिस का झाला?
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : डाॅक्टरसाहेब, मला तर कोरोना झालाच नव्हता, मग आता म्युकरमायकोसिस कसा झाला, असा सवाल रुग्णांकडून केला जात आहे. तिसऱ्या लाटेनंतर घाटी रुग्णालयात गुरुवारी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या एका २२ वर्षीय महिलेची शस्त्रक्रिया झाली. म्युकरमायकोसिसग्रस्त झालेला टाळूचा भाग, नाकाच्या सायनसच्या पोकळीतील भाग काढण्यात आला. सुदैवाने तिचे डोळे वाचले. तिला कोरोनाची लागण झालेली नव्हती, मात्र १५ दिवसांपूर्वीच मधुमेहाचे निदान झाले. केवळ कोरोनाग्रस्तांनाच नव्हे तर इतर काही आजारांतील रुग्णांनाही म्युकरमायकोसिस होतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘म्युकरमायकोसिस’ने राज्यभरात एकच हाहाकार उडाला होता. कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टिरॉइड्स, ऑक्सिजनमधील काही परिस्थितीमुळे म्युकरमायकोसिस होत असल्याचे सांगितले जात होते. परंतु, कोरोना झाला नाही म्हणजे म्युकरमायकोसिस होत नाही, हा गैरसमज आहे. घाटीतील कान-नाक-घसा विभागाच्या ओपीडीत गुरुवारी आलेल्या ७९ वर्षांच्या व्यक्तीलाही म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ८६ टक्के रुग्णांनी यशस्वी उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. या आजारामुळे डोळे काढावेच लागतात, हा समज घाटीतील डाॅक्टरांनी खोटा ठरविला. अनेक रुग्णांचे डोळे वाचविण्यात डाॅक्टरांना यश आले.
महिनाभरात दोघांवर शस्त्रक्रिया
मधुमेहासह इतर आजार की, ज्यामध्ये रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो. महिनाभरापूर्वी एका म्युकरमायकोसिस रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गुरुवारी २२ वर्षीय महिलेची शस्त्रक्रिया करून तिचे डोळे वाचविण्यात यश मिळाले.
- डाॅ. सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी
कोरोना नसलेले ३० टक्के रुग्ण
घाटीत गेल्या दोन वर्षांत म्युकरमायकोसिसच्या ३१२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील ३० टक्के रुग्णांना कोरोना नव्हता. तरीही त्यांना म्युकरमायकोसिस झाल्याचे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.
...यांना असतो धोका
मधुमेहग्रस्त, कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचे प्रत्यारोपण झालेल्या, डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने 'म्युकर'चा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या आजारांत अधिक काळजी घेण्याची गरज असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.