सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला बजावली नोटीस
By Admin | Updated: January 15, 2016 00:10 IST2016-01-14T23:56:21+5:302016-01-15T00:10:41+5:30
औरंगाबाद : अजिंठा ते औरंगाबाद या रस्त्याचे काम रखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला बजावली नोटीस
औरंगाबाद : अजिंठा ते औरंगाबाद या रस्त्याचे काम रखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत कंत्राटदार मशिनरी औरंगाबादेत आणील, त्यानंतर कामाला वेग येईल, असा दावा अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी यांनी केला.
लोकमतने १४ जानेवारीच्या अंकात काम रखडल्याचे वृत्त प्रकाशित करताच विभाग खडबडून जागा झाला आहे. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील विभागाच्या अभियंत्यांना फोनवरून रस्त्याच्या कामाप्रकरणी विचारणा केली. काम घेतलेल्या जगताप कन्स्ट्रक्शन्सला बँक गॅरंटी मिळण्यास विलंब होत असल्यामुळे काम सुरू करण्यास उशीर होत असल्याचा दावा अभियंता करीत आहेत.
२५ कोटींचे काम १७ कोटीत घेतले आहे. ८ कोटी रुपये वाढीव कामांत कंत्राटदाराला देण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. ४५ दिवसांत त्या रस्त्यासाठी डांबरी प्लांट सुरू होणे गरजेचे होते. अत्याधुनिक हॉटमिक्स प्लांट, मेकॅनिकल स्प्रेअर, पेव्हिंग फिनिशर इ. मशिनरी स्कॅडा या नवीन नियमानुसार असणे आवश्यक आहे. डांबरी प्लांटमधून बाहेर जाणारा माल व तो किती वेळेत वापरला गेला, याचे रेकॉर्डदेखील कंत्राटदाराला आॅनलाईन ठेवावे लागणार आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या ९७/२०१३ या मानकानुसार ४५ दिवसांत डांबराचा प्लांट सुरू केला नाही तर कंत्राटदाराने भरलेली ईएमडी जप्त करण्यात येते. या सगळ्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे धाडस बांधकाम विभागाने दाखविलेले नाही.