जनता त्रस्त; तलाठी मस्त

By Admin | Updated: June 26, 2014 00:42 IST2014-06-26T00:37:20+5:302014-06-26T00:42:25+5:30

हिंगोली : ग्रामीण भागात प्रशासनाचा मुख्य कणा असलेला महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच शेत जमिनीशी संबंधित विविध नोंदी करणे, शेतकरी

Public distress; Talathi mast | जनता त्रस्त; तलाठी मस्त

जनता त्रस्त; तलाठी मस्त

हिंगोली : ग्रामीण भागात प्रशासनाचा मुख्य कणा असलेला महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच शेत जमिनीशी संबंधित विविध नोंदी करणे, शेतकरी व विद्यार्थ्यांना लागणारी विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेला तलाठी जिल्ह्यात मस्त असून, जनता मात्र तलाठ्याच्या भेटीसाठी त्रस्त झाली असल्याचे बुधवारी ‘लोकमत’ ने जिल्हाभरात ७८ गावांमध्ये केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे स्पष्ट झाले.
सध्या शैक्षणिक वर्षास सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. शिवाय खरीप हंगामासही सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा, होल्डींग, नमुना नं. ८ आदी कागदपत्रे लागतात. या कागदपत्रांसाठी तलाठी गावात येत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होत असल्याचे काही ग्रामस्थांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन सांगितले. त्यानंतर बुधवारी या विषयावर स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. त्यामध्ये कामचुकार तलाठ्यांचे पितळ उघडे पडले. या तलाठ्यांवर मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी ना जिल्हाधिकारी, कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पहावयास मिळाले. बहुतांश तलाठी हे मुख्यालयी न राहता शहराच्या ठिकाणी राहून कारभार करीत असल्याचे दिसून आले. तलाठ्यांचा कारभार त्यांच्या अनधिकृत सहाय्यकावरच अवलंबून असल्याचे निदर्शनास आले.
हिंगोली तालुक्यातील खांबाळा या गावास बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास भेट दिली असता येथे तलाठी कार्यालयाची इमारतच नसल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीमध्ये तलाठी बसतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. येथील तलाठी प्रदीप इंगोले हे नियुक्ती झाल्यापासून एकदाही गावामध्ये आले नसल्याचे येथील ग्रामस्थ मारोती पवार, वैजनाथ काळे, सुभाष काळे आदींनी सांगितले. तलाठी इंगोले यांच्याशी प्रमाणपत्र हवे असल्याचे सांगून मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी हिंगोलीतील सरकारी दवाखान्याजवळ कार्यालय आहे, तेथे येऊन प्रमाणपत्र घेऊन जाण्यास सांगितले.
खांबाळा या गावामध्ये उद्या येणार असल्याचे इंगोले म्हणाले. त्यानंतर इंचा या गावाला १२ वाजता भेट दिली असता येथील तलाठी श्रीमती एस. एस. सूर्यवंशी या महिनाभरातून एक वेळा गावात येत असल्याचे येथील ग्रामस्थ गैसू ठाकरे, सुभाष डोल्हारे यांनी सांगितले. तलाठी सूर्यवंशी या नांदेड येथे राहतात. त्यांनी हिंगोली येथे एक खोली घेतली आहे. विविध प्रमाणपत्रे हवी असल्यास त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता प्रारंभी तर त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नाही. खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर त्या त्यांच्या सोयीनुसार हिंगोलीला येण्याची तारीख सांगतात, असे सुनील चक्रे यांनी सांगितले.
यासंदर्भात तहसीलदारांकडे तक्रार करूनही काहीही कारवाई झाली नसल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर भांडेगाव येथे भेट दिली असता येथील तलाठी आर. एन. दामोधर हे चक्क अकोल्याहून कारभार पाहत असल्याचे प्रल्हाद जगताप, महादू जगताप, सीताराम जगताप, इंगोले या ग्रामस्थांनी सांगितले. महिन्यातून दोन वेळा त्यांचे दर्शन होते, असे उपहासाने हे ग्रामस्थ म्हणाले. तातडीने प्रमाणपत्रे हवे असल्यास काहीच करू शकत नाही, अशी हतबलताही त्यांनी दाखविली.
एका तासात ३५ ग्रामस्थांच्या चकरा
नर्सी नामदेव येथील तलाठी सज्जास ‘लोकमत’ च्या चम्मुने भेट दिली. सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत येथे ठाण मांडून बसले असता येथील तलाठी आर. एस. इनामदार हे तलाठी गावात आलेच नाहीत. या कालावधीत तब्बल ३५ ग्रामस्थ विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी तलाठ्याच्या शोधार्थ आल्याचे पहावयास मिळाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता गेल्या आठ ते दहा दिवसांपासून इनामदार नर्सी येथे आलेच नसल्याचे ग्रा. पं. सदस्य बबन सावंत, मुरली टेमकर, रवी टेमकर, नंदाबाई गायकवाड, प्रभाकर काकडे यांनी सांगितले. तलाठी इनामदार यांच्याकडे पहेणी हाही सज्जा येतो. त्यामुळे पहेणी या गावास १२ च्या सुमारास भेट दिली असता येथेही तलाठी इनामदार आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ४ ते ५ दिवसांपूर्वी ते येथे आल्याचे ग्रामस्थ म्हणाले. त्यानंतर जांभरूण आंध या गावास भेट दिली असता येथेही इनामदार गेल्या ३ महिन्यांपासून आले नसल्याचे बाजीराव जुमडे, महादू जुमडे, लक्ष्मण जुमडे या ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर वैजापूर या गावास भेट दिली असता तेथेही इनामदार पंधरा दिवसांपासून आले नसल्याचे माजी सरपंच हारजी डांगे यांनी सांगितले. याबाबत इनामदार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

प्रत्येक गावात नेमले अनधिकृत दलाल
गावामध्ये सतत उपस्थित राहणे जमत नसल्याने अनेक तलाठ्यांनी संबंधित सज्जाच्या गावात अनधिकृत दलाल नियुक्त केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावामध्ये काय चालले आहे? तलाठ्याची कोण चौकशी करीत आहे? याबाबतची इंत्यभूत माहिती देण्याचे काम हे दलाल करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या दलालांच्या भरवशावरच तलाठ्यांचे दफ्तर ‘अपडेट’ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तलाठ्यांना निश्चित कालावधीत करावी लागणारी कामे
वारस तपास, खरेदीखत/ बक्षीस, हक्क सोडपत्र नोंद, सहहिस्सेदार नोंद (सर्व कामांसाठी पंधरा दिवसांचा कालावधी), ई- करार बोझा (१० दिवस), तक्रार नोंद ( ३ महिने), उत्पन्नाचा दाखला, पुरवठा पत्रक दाखला, सातबारा नक्कल, ८ अ नक्कल, फेरफार नक्कल, नॉनक्रिमिलेअर दाखला (एका दिवसात प्रमाणपत्र देणे बंधनकारक), नवीन पुरवठापत्र मागणी अर्ज चौकशी (७ दिवस).
सोन्ना येथील तलाठी कार्यालयात गहू, ज्वारी
हट्टा : हट्टा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या सोन्ना येथील तलाठी कार्यालातील नुतन इमारतीमध्ये गहू, ज्वारीच्या थैल्या आढळून आल्या. तेथील तलाठी रजेवर गेल्याने सोन्ना गावाचा तात्पुरता कारभार हट्ट्याच्या तलाठ्याकडे देण्यात आला असून तलाठी कार्यालयास कुलूप लावलेले होते. कार्यालयाच्या आत धान्य ठेवलेले आढळून आले. या नवीन इमारतीच्या चाब्या येथील ग्रा.पं.च्या कारकुनकडे होत्या. तलाठी कार्यालय येथे बांधून सुद्धा हट्टा येथूनच कामकाज चालतो. ७/१२ महा.ई सेवेतून मिळत असल्याने तलाठी जास्त वेळ येत नसल्याचे येथील ग्रामस्थ भगवान जाधव, अंगद जाधव, हरिदास जाधव यांनी सांगितले. सावंगी तलाठी कार्यालयाचा कारभार वसमतहून चालू असल्याने ग्रामस्थांनी सांगितले.
अकोला, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोलीतून कारभार
स्टिंग आॅपरेशनदरम्यान बहुतांश तलाठी हे त्यांच्या मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून आले. अकोला, नांदेड, परभणी, वाशिम या परजिल्ह्यामध्ये राहून हिंगोली जिल्ह्यातील गावांचे कामकाज करण्याची किमया तलाठ्यांकडून होत असल्याचे दिसून आले. याशिवाय अनेक तलाठी हिंगोली शहरात राहून त्यांचा ग्रामीण भागातील सज्जा सांभाळत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

Web Title: Public distress; Talathi mast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.