छत्रपती संभाजीनगर : शाळेसमोरच लॉज उभारून कुंटणखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडीत उघड झाला. सोमवारी लॉज मालक सुरेश काथार, अशोक पाखरे यांच्यासह पीडितांची तस्करी करणाऱ्या जीवन राजपूतवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाण्यापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या कुंटणखान्याकडे पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने, संतप्त नागरिकांना छापा टाकण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा एकदा मुकुंदवाडी पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुकुंदवाडीत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्री, जुगारांचे अड्डे राजरोस सुरू आहेत. त्यातच रविवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरातील दोन लॉजवरील कुंटणखान्यांवर वाद होऊन आरडाओरड झाली. सततच्या त्रासामुळे संयमाचा बांध फुटलेल्या स्थानिकांनी दोन्ही कुंटणखान्यांची तोडफोड केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, महिला पदाधिकारी गायत्री पटेल यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेत एजंट व तेथील गिऱ्हाईकांना चोप दिला. पटेल यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुन्हा पश्चिम बंगाल कनेक्शनशहरासह जिल्ह्यात यापूर्वी अजिंठा, खुलताबाद, झाल्टा फाटा परिसरात पश्चिम बंगालच्या मुलींची देहविक्रीसाठी तस्करी उघड झाली होती. पोलिसांनी त्यांच्या वास्तव्यासंदर्भात कुठलीही खातरजमा केली नव्हती. मुकुंदवाडीतील कुंटणखान्यावर देखील मध्य प्रदेशातील एक व पश्चिम बंगालच्या दोन पीडित तरुणी आढळल्या. या तिघींनाही जीवन राजपूतनेच देहविक्रीसाठी आणल्याचे सांगितले जाते.
निरीक्षकांच्या बदलीनंतरही सुधारणा नाहीपोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नुकतीच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर त्यांनी अन्य निरीक्षकांना अवैध व्यवसायांवरून कठोर इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी, जयभवानीनगरमधील महिलांनी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे अवैध व्यवसायांबाबत पोलिसांविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी काळे यांनी पोलिसांवर चांगलाच संताप व्यक्त केला. मात्र, तरीही मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय थांबले नाहीत. याला ठाण्यातीलच काही विशिष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे परिमंडळ दोनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.