प्रोझोनमधील तिजोरी चोरणारा अटकेत
By Admin | Updated: March 15, 2016 00:36 IST2016-03-15T00:36:46+5:302016-03-15T00:36:46+5:30
औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील ‘गेम झोन’मधून सव्वालाख रुपये असलेली तिजोरी आणि सीसीटीव्हीची ‘हार्डडिस्क’ लंपास करणारा चोरटा चार्ली पोलिसांच्या

प्रोझोनमधील तिजोरी चोरणारा अटकेत
औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील ‘गेम झोन’मधून सव्वालाख रुपये असलेली तिजोरी आणि सीसीटीव्हीची ‘हार्डडिस्क’ लंपास करणारा चोरटा चार्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दोन तासांत अटक करण्यात आला. एकीकडे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया संपत नाही तोच दुसरीकडे आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मयांक जैन (२३, रा. इंदौर, मध्यप्रदेश) असे चोरट्याचे नाव आहे. तो इंदौर येथे बीबीएचे शिक्षण घेतो.
प्रोझोन मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर ‘गेम झोन’ आहे. पुष्कर रवींद्र भातांब्रेकर (रा. एन-७, सिडको) हे तेथे व्यवस्थापक आहेत. सोमवारी सकाळी ते गेम झोनमध्ये गेले. त्यावेळी तिजोरी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केली मात्र कुणालाच माहिती देता येत नसल्याने शेवटी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले तर महिनाभरापूर्वीच कामाला असलेल्या नोकराने तिजोरी लांबवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भातांब्रेकर यांनी ‘गेम झोन’मधील तिजोरी गायब झाल्याची तक्रार एमआयडीसी सिडको ठाण्यात दिली. एकीकडे सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे क्रांतीचौक ठाण्याचे चार्ली पोलीस विकास गुमलाडू आणि योगेश भंगड हे गस्तीवर असताना रेल्वेस्टेशन परिसरातील राजूनगर भागात त्यांना एकजण तिजोरी फोडताना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने ही तिजोरी रेल्वेस्टेशन भागातच सापडल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यामुळे त्यांनी त्याला चार्ली पोलिसांचा हिसका दाखवला. त्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली.