पाचही योजनांचे प्रस्ताव अप्राप्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST2017-07-19T00:16:53+5:302017-07-19T00:33:51+5:30
हिंगोली : मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात पाच योजना कार्यान्वीत असून चालू शैक्षणिक वर्षातील विविध योजनेसाठी १० जुलै २०१७ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते.

पाचही योजनांचे प्रस्ताव अप्राप्तच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात पाच योजना कार्यान्वीत असून चालू शैक्षणिक वर्षातील विविध योजनेसाठी १० जुलै २०१७ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. शिवाय वेळेत प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आल्या. मात्र शाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही अद्याप एकाही तालुक्याने प्रस्ताव दाखल केला नाही.
मागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक वाढावा, यासाठी शासनाकडून हिंगोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र योजनेला जिल्ह्यात घरघर लागल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वेळेत कधीच मिळत नाही. संबंधित अधिकारी-कर्मचारीही तांत्रिक अडचणी सांगत असल्याचे तर नित्याचेच बनले आहे. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमाच्या योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट दिसून येते.
सदर योजनेअंतर्गत १० जुलैपर्यंत मुलींना मोफत सायकलींसाठी तसेच अभ्यासिका केंद्र सुरू करणे, शिवाय इतर विविध योजनांचे प्रस्ताव मागविले होते. जि. प. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना चार वेळेस पत्रव्यवहार करूनही अद्याप प्रस्ताव अप्राप्तच आहेत. त्यामुळे १७ जुलै रोजी याबाबत पुन्हा एकदा पत्र काढले असून माहिती तत्काळ कार्यालयास कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली व औंढा नागनाथ तालुक्यांचा सामावेश मानव विकास मिशन कार्यक्रमात आहे.