मालमत्ता कर वसुली; सहा दुकानांना सील !
By Admin | Updated: March 11, 2017 00:20 IST2017-03-11T00:19:30+5:302017-03-11T00:20:49+5:30
लातूर : लातुरातील व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील ३२ दुकानांवर जप्तीचा बडगा उगारला.

मालमत्ता कर वसुली; सहा दुकानांना सील !
लातूर : लातुरातील व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील ३२ दुकानांवर जप्तीचा बडगा उगारला. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने २६ दुकानदारांनी २० लाख रुपयांची थकबाकी जमा केली असून, सहा दुकानदारांनी थकबाकी न भरल्याने पथकाने त्यांच्या आस्थापनांना सील केले आहे.
वर्षानुवर्षे मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या व्यावसायिकांच्या आस्थापनांना सील करण्याची कारवाई मनपाने सुरू केली असून, गेल्या दोन दिवसांत ३२ आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी २६ जणांनी २० लाख रुपयांचा भरणा केला असून, ६ दुकानदारांनी मात्र मनपाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जप्ती पथकाने प्रभावती प्रभू बावगे यांच्या तीन दुकानांना सील केले आहे. त्यांच्याकडे ५० हजारांची थकबाकी आहे. रज्जाक सय्यद यांचेही दुकान सील केले असून, त्यांच्याकडे ४२ हजार ८४८ रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. शैलेश चन्नाप्पा शेटे यांचेही दुकान सील करण्यात आले असून, त्यांच्याकडे १ लाख ९१ हजार ५५५ रुपयांची थकबाकी आहे. भागिरथी मदनलाल रांदड यांचेही दुकान सील करण्यात आले असून, त्यांच्याकडे १ लाख ३ हजार रुपयांची थकबाकी असून, काझी यांचे दुकानही सील करण्यात आले असून, त्यांच्याकडे ७ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे मनपाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी सांगितले.