अधिकार्यांच्या मुक्कामात आश्वासनांचा सुकाळ
By Admin | Updated: May 28, 2014 00:40 IST2014-05-28T00:23:51+5:302014-05-28T00:40:41+5:30
हिंगोली : राज्याच्या मुख्य सचिवांनी ग्रामीण भागातील एका गावामध्ये जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांनी मुक्काम ठोकून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून

अधिकार्यांच्या मुक्कामात आश्वासनांचा सुकाळ
हिंगोली : राज्याच्या मुख्य सचिवांनी ग्रामीण भागातील एका गावामध्ये जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांनी मुक्काम ठोकून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे आदेश दिल्यानंतर सोमवारी रात्री जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकार्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे मुक्काम ठोकला. त्यानंतर त्यांनी येथे ग्रामस्थांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात आश्वासनांची खैरात वाटली. राज्याचे मुख्य सचिव सहारिया यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व तेथे मुक्काम करण्यासाठी पिंपळदरीची निवड करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड, वसमतच्या उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी आदींसह तालुक्यातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी पोहोचले. त्यानंतर येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी अडचणींचा पाढा या अधिकार्यांसमोर वाचला. त्यामध्ये वीज, पाणी, रस्ते, अन्न-धान्य पुरवठा, घरकूल योजना, नरेगा, निराधार योजना, क्रीडांगण आदींचा समावेश आहे. त्यानंतर अधिकार्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींचे तातडीने निवारण केले जाईल, असे सांगत आश्वासनांची खैरात वाटली. त्यामध्ये अंत्योदय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना धान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिस पाटील, कोतवालाची नियुक्ती शासनाच्या आदेशान्वये करण्यात येईल, असे सांगण्यात आले. आदिवासींना आदिवासी विभागामार्फत घरे देण्याची कार्यवाही केली जाईल, खराब रस्त्यांची नोंद घेऊन संबंधित अधिकार्यांना रस्ता दुरूस्तीचे आदेश देण्यात येतील, निराधारांना शासकीय योजनेतून लाभ देण्यासाठी सर्व्हे करण्यात येईल, तलाठ्यांबाबतच्या तक्रारींचे निवारण उपविभागीय अधिकार्यांमार्फत केले जाईल, असे सांगून क्रीडांगण व वाचनालयासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच वीज व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल. नरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, आदी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. आता प्रत्यक्षात ही आश्वासने अधिकारी पूर्ण करणार की, राजकीय नेत्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हवेत विरणार? याकडे पिंपळदरीवासियांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)