प्रकल्पांच्याच घशाला कोरड
By Admin | Updated: May 31, 2014 00:32 IST2014-05-31T00:09:33+5:302014-05-31T00:32:35+5:30
उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्या जिल्ह्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली होती.
प्रकल्पांच्याच घशाला कोरड
उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्या जिल्ह्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच भूम, वाशी, कळंब या तालुक्यातील बहुतांश लहान मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. आजघडीला प्रकल्पातील पाणी पातळी चिंताजनक आहे. मध्यम व लघु असे ६९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. परिणामी टंचाईचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. भूम, वाशी, परंडा आणि कळंब या तालुक्यामध्ये गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळेच या तीन-चार तालुक्यातील जवळपास ८४ गावांना अधिग्रहण व टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक टँकरची संख्या वाढू लागली आहे. कारण या परिसरातील जलस्त्रोतही तितक्याच झपाट्याने कोरडेठाक पडत आहेत. धरणांची पाणीपातळीही त्याच गतीने कमी होऊ लागली आहे. जिल्हाभरात लहान-मोठे व मध्यम प्रकल्पांची संख्या २११ इतकी आहे. यामध्ये १७ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची साठवण क्षमता २०२.८५९ दलघमि इतकी आहे. प्रत्यक्षात आजघडीला १८.५७७ दलघमि इतका अत्यल्प साठा आहे. लघु प्रकल्पाच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. १९३ प्रकल्पात प्रत्यक्ष २६.०१९ इतकाच साठा उपलब्ध आहे. दरम्यान, २११ पैकी ६९ प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक राहिलेला नाही. यामध्ये ६५ लघु तर ४ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच ६२ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. तर ४ लघु मध्यम प्रकल्पामध्ये ५० टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. प्रकल्पाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने त्या-त्या भागातील विहिरी, हातपंप हेही तेवढ्याच गतीने बंद पडू लागले आहेत. त्यामुळे जलसंकट दिवसागणिक तीव्र होऊ लागले आहे. भूम तालुक्यामध्ये सध्या २४ गावे आणि ९ वाड्यांना २७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही या तालुक्यातील ग्रामस्थांनी टंचाईच्या तीव्र झळा सोसल्या आहेत. यावर्षीही त्यापेक्षा काही वेगळी स्थिती नाही. डिसेंबर महिन्यापासून वालवड सर्कलमधील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंब तालुक्यातही टँकरची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या १४ गावांची तहान ६४ अधिग्रहण आणि १८ टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे. परंडा तालुक्यातील टँकरचा आकडा दोनवरुन पाचवर जाऊन ठेपला आहे. तसेच दोन जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या माध्यमातून पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाशी तालुक्यात ९ टँकर सुरु आहेत. तसेच ८ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या माध्यमातून १२ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. भविष्यात वेळेवर पाऊस न पडल्यास हे जलसंकट अधिक गडद होऊ शकते. (प्रतिनिधी)