सोनोग्राफी केंद्र बंद ठेवून डॉक्टरांकडून निषेध
By Admin | Updated: April 16, 2015 00:59 IST2015-04-16T00:52:18+5:302015-04-16T00:59:38+5:30
लातूर : डॉक्टरांच्या वतीने पीसी-पीएनडीटी कायदा १९९४ अंतर्गत सोनोग्राफी तज्ज्ञांवर एफ फॉर्म भरण्यासाठी होत असलेल्या अन्यायाविरोधात व या कायद्यात आवश्यक दुरुस्ती व्हावी,

सोनोग्राफी केंद्र बंद ठेवून डॉक्टरांकडून निषेध
लातूर : डॉक्टरांच्या वतीने पीसी-पीएनडीटी कायदा १९९४ अंतर्गत सोनोग्राफी तज्ज्ञांवर एफ फॉर्म भरण्यासाठी होत असलेल्या अन्यायाविरोधात व या कायद्यात आवश्यक दुरुस्ती व्हावी, यासाठी १५ एप्रिल रोजी देशव्यापी संपास पाठिंबा म्हणून लातूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी सोनोग्राफी केंद्र बुधवारी बंद ठेवून निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
देशभरात सोनोग्राफी तज्ञ असणाऱ्या डॉक्टरांना एफ फॉर्म भरत असताना लेखी चुकांसाठी आणि गर्भलिंग निदान यासाठी सारख्याच शिक्षेचे प्रावधान आहे़ आजपर्यंत भारतातील सर्व सोनोग्राफी मशिनवरील कार्यवाहीत ९९ टक्के केसेस फक्त एफ फॉर्ममधील शुल्लक त्रुटीमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे या नोंदणी फॉर्ममधल्या होणाऱ्या चुका याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे़ गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर्स, रुग्ण किंवा नातेवाईक यांना स्टिंग आॅपरेशन, डेकॉय केसेसद्वारे पकडावे़ इमानदार असणाऱ्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देऊ द्याव्यात़ यासोबतच डॉक्टरांवर होत असलेले विविध आरोप यांचा बुधवारी डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध करुन आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाबाबत लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून या कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे़
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ संजय वारद, सचिव डॉ़ कल्याण बरमदे, डॉ़ दीपक गुगळे, डॉ़ संगीता गटागट, डॉ़ संदीप कवठाळे, डॉ़ सुरेखा निलंगेकर, डॉ़ स्रेहल देशमुख, डॉ़भालचंद्र सुचित्रा, डॉ़ गणेश पाटील, डॉ़ संजय पाटील, डॉ़ दत्तात्रय मंदाडे आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)